मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत असून त्यांच्या शेजारी पत्नी रश्मी ठाकरे बसल्या आहेत. मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले आहे. याअगोदही ते स्वतः गाडी चालवत गेले होते.
मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत. वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई केशव कोलते हे महापूजा करतील. कोलते हे २० वर्षापासून मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.
राज्य सरकारने राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पालख्याही सकाळी शिवशाही बसने रवाना झाल्या. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.