मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तातडीने स्थगिती देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. शेतकरी व आपत्तीग्रस्त नागरिकांना दुष्काळी निकषांनुसार मिळणाऱ्या सवलतीप्रमाणेच सुविधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दिलासा मिळावा म्हणून गहू, तांदूळ, डाळी आणि आवश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. विहीर खचणे किंवा अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून जाणे अशा नुकसानीवर जे केंद्र सरकारच्या निकषांत बसत नाही, त्यावरही राज्य सरकारकडून स्वतंत्र मदत केली जाणार आहे. नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाईल. केंद्र सरकारची मदत येईपर्यंत राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर ती रक्कम केंद्राकडून ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण पाच निर्णय झाले. या बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दिवाळीपूर्वी शेतक-यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. ते म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. ओला दुष्काळ आतापर्यंत कधी जाहीर झालेला नाही. ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती, उपायोजना केल्या जातात. तशाच प्रकारच्या सवलती दुष्काळी टंचाई पडली आहे, असं समजून यावेळी सुद्धा सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचा अर्थ तोच असतो. नुकसानीची आकडेवारी जमा होत आहे. पुढच्या आठवड्यात मी, शिंदे साहेब, अजितदादा बसून निर्णय घेणार आहोत, घोषणा करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात आपण २११४ कोटी रुपये शेतक-यांना वितरित करण्याचे काम सुरु केले आहे. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचा असेंसमेंट घेता येत नव्हते. त्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसात सगळी माहिती पोहोचेल. त्यानंतर सगळ्या नुकसानीच्या संदर्भात एक कॅाम्प्रिएनसीव पॅालिसी तयार करुन आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यांमध्ये घोषणा आम्ही करुन आणि शक्यतो शेतक-यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.