नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून गेली आहे. तर या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गचा व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे ८ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत.
पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे.
सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला असून, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. यामुळे मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबविण्यात आले आहे.
- जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती आहे.
- माजलगाव धरणातून 41,701 क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे. हा पूर्वी 95,000 क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आला आहे.
- धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून 75,000 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. काही ठिकाणाहून तो 60,000 क्युसेक इतकाच आहे.
- उजनीमधून 1 लाख क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.
(विसर्ग स्थिती: सकाळी 9 वाजताची)