पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा): पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनामार्फत १७ सप्टेंबर पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत व्यापक स्तरावर प्रचार व प्रसार उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देणे, ग्रामपंचायतींना सक्षम व आत्मनिर्भर बनविणे, सुशासन तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.
अभियानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती अभियान, कार्यशाळा, ग्रामसभा, पत्रके, भित्तीपत्रके, चित्ररथ, कलापथक, सोशल मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग करून व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना, युवक मंडळे व स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.
अभियानाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र कक्ष (War Room) स्थापन करण्यात आले आहेत. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांना तालुकानिहाय संपर्क अधिकारी, तसेच पंचायत समिती स्तरावर विभाग प्रमुखांना प्रत्येकी 20 गावांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, जिल्हा स्तरावर शुभारंभ माननीय पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय शुभारंभाचे आयोजन माननीय स्थानिक आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शुभारंभाच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, या ग्रामसभेतून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना पाहता यावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामसभेसाठी तालुकास्तरीय अधिकारी गावागावात संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मार्फत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सक्षम व विकासाभिमुख बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे ग्रामविकास प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास व लोकसहभाग वाढून पुणे जिल्हा “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”च्या अंमलबजावणीत आघाडीवर राहील, असा विश्वास असून, यासाठी सर्व अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.