इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून काल रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचाली वाढल्या आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.त्यांनी उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या परत जात असतांना त्याची गाडी आज आंदोलकांनी रोखत घेराव घातला. यावेळी शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशा घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या गाडीवर बॅाटलही फेकल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत गाडीला वाट मोकळी करुन दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे परत गेल्या.
या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले असं करण योग्य नाही. कुठलेही नेते तिथे गेल्यावर त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. घोषणाबाजी करणे बाटल्या फेकणं योग्य नाही. हुडदंगबाजी करुन काहीच मिळणार नाही. आम्ही मराठा समाजासाठी हिताचे निर्णय़ घेतले आहेत. मी आणि एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिले. मराठा समाजाचे आरक्षणाचा लाभ घेत आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी ते आंदोलनावर बोलतांना म्हटले आहे की, जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. आडमुठ्या भूमिकेने तोडगा निघत नाही. चर्चेतून निर्णय होतो. कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ लागेल. कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करुन चालणार नाही. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. यामुळे मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.