इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
‘ऑपरेशन सिंदूर’ या देशाला अभिमान वाटणा-या मोहीमेला ‘माध्यमांवरील सरकारचा तमाशा’ म्हणणा-या काँग्रेसच्या हीन प्रवृत्तीचा मी निषेध करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर बाबत पुराव्यानिशी विस्तृतपणे सत्य आणि वास्तव समोर मांडल्यानंतर काँग्रेस पूर्णपणे उघडी पडली आहे. जी भाषा पाकिस्तानचे नेते बोलतात तीच भाषा काँग्रेसचे नेते पूर्णविराम-स्वल्पविरामासकट बोलतात हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले असा घणाघातही त्यांनी केला.
जे काँग्रेसच्या मनात आहे तेच शब्द काँग्रेसच्या नवीन सदस्यांच्या तोंडून वदवून घेण्याच्या काँग्रेसच्या हीन प्रयत्नांवर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना केलेल्या प्रहाराचा उल्लेख करत फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे म्हणजे या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वेदनेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दैदिप्यमान कामगीरी करत पाकिस्तानच्या दहशतवादाला पायबंद घालणा-या भारतीय सेनेचा हा अपमान आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.