इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सकाळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आणि पीकविम्यावर बोलतांना सांगितले की, शासन शेतक-यांकडून एक रुपया घेतं, आम्ही शेतक-याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच -साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले. माझे आतापर्यंत ५२ अर्ज निघालेले आहेत. असे सांगितले. आता या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
गडचिरोली दौ-यावर असतांना पत्रकारांनी कोकाटे यांच्या शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही या विधानाविषयी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी ही नाराजी व्यक्त केली. कोकाटे नेमकं काय म्हणाले हे मी एेकलेलं नाही. तथापी त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. पण, आज सकाळी त्यांनी सिन्नर येथे पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यास नकार दिला. या पत्रकार परिषदेत कोकाटे म्हणाले की, हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहित नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहित नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लीकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे. तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेलो नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहे असे म्हटले. त्यानंतर याच पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या कृषी योजनेची माहिती दिली. त्यात त्यांनी आम्ही शेतक-याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही असे म्हटले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.