नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- म्हसरूळ येथील ३० वर्षीय निकिता पंकज पाटोळे यांना अचानक ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्या कोमामध्ये गेल्या होत्या. घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च यामुळे पती पंकज पाटोळे यांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सल्ल्याने त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आणि कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अवघ्या ४८ तासांत रूग्णाला मदत मिळाली. त्यातून निकितावर उपचार सुरू झाले आणि तब्बल २९ दिवस कोमात असलेल्या निकिताला शुद्धीवर येऊन आपल्या नवजात मुलीला जवळ घेण्याचा भावनिक क्षण अनुभवता आला.
आनंदावर अचानक आलेले संकट
निकिता आणि पंकज यांना सहा वर्षांचा मुलगा असून, यंदा ७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, १३ फेब्रुवारीच्या रात्री निकिताला अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही क्षणांतच त्या बेशुद्ध पडल्या. गावातील स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील श्री नारायणी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत निकिताला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निदान झाले. मेंदूच्या डाव्या बाजूस रक्तस्त्राव आणि सूज आल्याने त्या कोमात गेल्या. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
आर्थिक संकट आणि शेतजमीन विकण्याचा निर्णय
पाटोळे कुटुंबाकडे तीन लाख रुपयांचा आरोग्य विमा होता. मात्र, खर्चाची रक्कम त्यापेक्षा कितीतरी जास्त असल्याने आणि हातात रोख रक्कम नसल्याने पंकज आणि त्यांचे भाऊ योगेश जाधव यांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकण्यासाठी ग्राहक शोधण्यास सुरुवात केली. या कठीण प्रसंगी त्यांना गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ४८ तासांत मदत
पंकज यांनी तात्काळ कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. पुढे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आणि कक्ष प्रमुखांच्या प्रयत्नांतून अवघ्या ४८ तासांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. यासोबतच लिला हिरा सेवाभावी संस्था आणि सिद्धीविनायक सेवाभावी संस्थेकडून औषधांसाठी आर्थिक मदत मिळवून दिली. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे संबंधित रुग्णालयाला पुढील उपचाराची खात्री मिळाली आणि निकितावर जलदगतीने उपचार सुरू झाले.
बाळाला मिळाली मायेची ऊब
उपचारांना यश आल्याने २९ दिवस कोमात असलेली निकिता अखेर शुद्धीवर आली. दोन दिवसांपूर्वीच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. कोमातून बाहेर पडलेल्या निकिताने आपल्या मुलीला प्रथमच जवळ घेतले, तेव्हा पंकज आणि माहेरच्या मंडळींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आणि मदत करणाऱ्या सर्व डॉक्टर व अधिकाऱ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, त्यांच्यामुळेच आमच्या कुटुंबाला आपली लेक, पत्नी आणि आई परत मिळाली अशी भावना पंकज पाटोळे व कुटूंबियांनी व्यक्त केली.