नवी दिल्ली – पर्वतीय प्रदेशात एका तासात दहा सेंटीमीटरहून अधिक पाऊस झाल्यास ढगफुटी झाली असे आपण म्हणतो. मुसळधार पावसाचा मारा झाल्यानंतर वित्तहानीसह जीवितहानीही होते. भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा सांगतात, ढगफुटी ही खूपच छोट्या स्तरावरील घटना आहे. हिमालयाच्या पर्वतरांगा किंवा पश्चिम घाटात अशा प्रकारचा पाऊस पडतो. नैऋत्य मान्सनूचे गरम वारे थंड हवेत मिसळल्यानंतर मोठे ढग बनतात. भौगोलिक परिस्थितीमुळेसुद्धा अशी स्थिती होऊ शकते.
स्कायमेट व्हेदरचे उपाध्यक्ष महेश पलवत सांगतात, अशा ढगांना क्युमुलोनिंबस असे म्हणतात. या ढगांची उंची १३ ते १४ किलोमीटरपर्यंत असू शकते. ज्या भागात हवा नसते, अशा ठिकाणी हे ढग फसले तर मुसळधार पाऊस होतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन सांगतात, ढगफुटींच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. याच महिन्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये ढगफुटीच्या घटना घडल्या.
आयएमडीचे तज्ज्ञ सांगतात, ढगफुटीचे स्थान आणि वेळ पाहिली तर अशा घटना खूपच कमी स्तरावर होतात. त्यामुळे ढगफुटीच्या घटनांचा अंदाज लावणे कठीण आहे. ढगफुटीच्या घटनांची वेळेवर माहिती मिळण्यासाठी तसेच त्यावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित ठिकाणांवर रडार नेटवर्कची गरज आहे. किंवा अधिक पृथ्थकरण करणारे हवामान अंदाजाचे मॉडेल असणे गरजेचे आहे. ढगफुटीसारख्या घटना मैदानी परिसरातही होतात. परंतु पर्वतीय प्रदेशात काही भौगोलिक कारणांमुळे अशा घटना अधिक घडतात.
महापात्रा सांगतात, ढगफुटीच्या घटनांचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. परंतु आम्ही अतिमुसळधार पावसाचा इशारा देऊ शकतो. हिमाचल प्रदेशाबाबत आम्ही मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पृथ्वी विज्ञान मंत्रालयात कार्यरत वरिष्ठ शास्त्रज्ञ कमलजीत रे सांगतात, ढगफुटीच्या अनेक घटनांची माहितीच मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र असावे असे काही नाही. अशा घटना खूपच कमी वेळेसाठी असतात. या सामान्य हवामानाच्या घटना नाहीत. वित्तहानीसह जीवितहानी होण्याची शक्यता जास्त असते.
डॉप्लर रडार प्रभावी
ढगफुटीच्या घटनांचा अंदाज लावणे कठीण आहे. डॉप्लर रडार या कामात खूपच फायदेशीर ठरू शकते. परंतु हिमालयीन पर्वतरांगेसारख्या प्रत्येक ठिकाणी रडार नसतात. २३ जुलैला पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, हिमालयीन क्षेत्रात सात डॉप्लर रडार आहेत. त्यापैकी दोन जमू-काश्मीरमध्ये (सोनमर्ग आणि श्रीनगर), दोन उत्तराखंड (कुफरी आणि मुक्तेश्वर) एक आसाम (मोहनबाडी), एक मेघालय (सोहरी), आणि एक त्रिपुरा (अगरतला) मध्ये आहे. हिमाचल प्रदेशात आणखी दोन डॉप्लर रडार बसविण्यासाठी राज्य सरकारकडून एनओसी मिळणार आहे.