मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून काल देण्यात आली आहे. पण, नाशिक जिल्ह्यातील ७ पर्यटकांचा संपर्कच झाला नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. यातील चार पर्यटक हे नाशिक येथील व्दारका येथील राहणारे आहेत. तर तीन पर्यटक हे मालेगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
संपर्क न झालेल्या या पर्यटकांची नावेही त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यात दीपक कोतकर , शौतक कोतकर, शरवील कोतकर, शुभांगी कोतकर नाशिक तर सुरेश येवला, नयना येवला, अनिकेत येवला हे मालेगाव येथील आहे. यांचे संपर्क नंबरही नातेवाईकांनी दिली आहे. त्यांनी याबाबात स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांशी संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
