सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उंबरठाण जवळील राशा येथील या दोन्ही रहिवाशी आहेत. या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुमिका नरेश राऊत (वय ११, इयत्ता ४थी) आणि उज्वला नरेश राऊत (वय ८, इयत्ता २ री) अशी मृत बहिणींची नावे आहेत. दोन्ही बहिणी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास राशा देऊळपाडा येथून बर्डी येथील गावतळे येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतांना थोरली बहिण भूमिका हिचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी उज्वला हिने पाण्यात उडी मारली. मोठ्या बहिणीला वाचविण्याच्या नादात दोघींनी घट्ट मिठी पडली. या दुर्घटनेत दोन्ही बहिणी तलावात बुडाल्या. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच दोन्ही बहिणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणींवर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. या दुर्घटनेबद्दल तहसिलदार सचिन मुळीक, नायब तहसिलदार राजेंद्र मोरे, गटविकास अधिकारी दिपक पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे रतन चौधरी, पांडुरंग पवार, तुकाराम भोये, सुधाकर भोये आदींनी शोक व्यक्त केला आहे.
Cloth Washing Two Sisters Drown in Lake Accident