उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते कार्यान्वीत
नाशिक – नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील बंद असलेला स्वस्तिक एअर प्रॉडक्ट या ऑक्सिजन निर्मिती करणारया प्रकल्प ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते आज बुधवारी रात्री कार्यान्वीत करण्यात आला. यावेळी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, कोविड संसर्ग झाल्यामुळे ऑक्सिजन अभावी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचा जीव वाचवणे ही शासनाची प्राथमिकता असून या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन मागणीचा ताण कमी होऊन दिलासा मिळेल .
यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, प्रभारी अधिक्षक अभियंता प्रेरणा बनकर, कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांचे सह उपस्थित होते. सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे स्वस्तिक एअर प्रॉडक्ट ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प प्रलंबित वीज देयके व इतर कारणामुळे बऱ्याच कालावधीपासून बंद होता. कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढत असून रुग्णाला ऑक्सिजनचा तुटवडा राज्यासह जिल्ह्यात जाणवत असून काळाची गरज ओळखून आमदार दिलीप बनकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ऊर्जा राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांचेकडे सदर प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.