मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कपडे आणि शूज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता जास्त किंमत मोजावी लागू शकते. कपडे आणि शूज उद्योगाच्या इनव्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याची दीर्घकाळची मागणी जीएसटी परिषदेने मान्य केली आहे. त्यामुळे कपडे आणि शूज महागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक, या वर्षी १ जानेवारीपासूनच याची अंमलबजावणी होणार होती. पण आता जीएसटी कौन्सिलच्या फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. तयार कपड्यांवर ५ ऐवजी १२ टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अद्याप दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. यासोबतच जीएसटी दरांमध्येही बदल करण्याचे अनेक प्रस्ताव आहेत. या प्रकरणाशी संबंधित दोन सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
वस्त्रोद्योग आणि शूज उद्योगातील व्यापारी अनेक दिवसांपासून रचना बदलण्याची मागणी करत होते. शूज बनवण्याच्या कच्च्या मालावर १२ टक्के जीएसटी आहे, तर तयार वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आहे, असे ते म्हणाले. तसेच तयार कपड्यांवर पाच टक्के जीएसटी आहे. तसेच इतर कच्च्या मालावर १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू होतो. हा तोटा भरून काढण्यासाठी कच्च्या मालावर भरलेले शुल्क परत करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत होती. जीएसटीच्या चौकटीत सध्याचे पाच प्रकारचे दर कमी करून ते तीन करण्याबाबत सुचवण्यासाठी मंत्र्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. दोन मंत्री गट दर सुधारणांचे परीक्षण करत आहे. हा गट फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल परिषदेला सादर करेल, ज्यामध्ये दर कमी करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या जातील.