पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाने हजेरी लावली मात्र आता पुन्हा पाऊस गायब झाल्याने हवामानात बदल होताना दिसतो. दुपारच्यावेळी कडक ऊन आणि उकाडा तर सायंकाळी ढगाळ हवामान, तसेच पहाटे आणि रात्री थंडगार वारे असा तिन्ही ऋतूचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यातच पुण्यातील हवेमध्ये आद्रता वाढल्याने नागरिकांना सर्दी खोकला, ताप, अंगदुखी या सारख्या आजाराने ग्रासले आहे. त्याप्रमाणे नव्या कोरोना व्हेरीएंट धोकादेखील वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने असे आजार उद्भवतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी भरपूर विश्रांती घ्यावी, बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत, चांगली व ताजी फळे ताजी फळे खावीत, भरपूर पाणी प्यावे, नियमित व्यायाम करावा, आरोग्याची काळजी घेताना गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, यासारख्या सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
गेल्या काही वर्षांत ऊन, पाऊस, थंडीसह अन्य हवामानाचे चक्र बदलू लागल्याचे दिसून येत आहे. तसाच अनुभव यंदाच्या पावसाळ्यात जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात दुपारी प्रचंड उकाडा आणि रात्री थंडी असा दुहेरी अनुभव पुणेकर घेत आहेत. या अनुभवाने पुणेकर तापाने फणफणले आहेत, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आपले शरीर कायमच तेथील हवामानाशी कार्यक्षमतेने जुळवून घेते. मात्र जेव्हा तापमानात मोठा बदल होतो तेव्हा त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो.