विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. बदलत्या हवामानामुळे तसेच सततच्या पावसाळी वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला, हिव- ताप, डेंग्यु, मलेरिया यासारखे आजार वाढले आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसत असून सरकारी तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. या आजारांपासून काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड औरंगाबाद आदि शहरात आता मुलांना संसर्गजन्य आणि विषाणूजन्य तापाने ग्रासले आहे. उत्तर भारतातील काही राज्यात देखील अशीच परिस्थिती आहे. यामध्ये सहा महिन्यांपासून एक वर्षापर्यंतची बालके तसेच १ते ६ वर्षाच्या मुलांना सर्दी-खोकला, ताप ते न्यूमोनिया सह अनेक साथीच्या आजाराने देखील त्रस्त आहेत. गेल्या दोन आठवड्यात हॉस्पिटलमध्ये अशा मुलांची संख्या अधिक वाढली आहे. काही शासकीय तसेच खासगी रुग्णालयाच्या आपत्कालीन व बाल विभाग मध्ये दररोज अनेक मुलांना दाखल केले जात आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो, परंतु रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
अनेक शहरात सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ताप, सर्दी ,खोकला, डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण खूपच जास्त आहे. तसेच खासगी रुग्णालयात सुद्धा रुग्णांची संख्या खूप असून ग्रामीण भागात तर डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. या परिसरात घरोघरी ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण आहेत. त्यातील अनेक रुग्ण हे घरीच उपचार करताना दिसतात तर काही जण औषधींचा दुकानात जाऊन स्वतःच औषध घेत आहेत.