नाशिक – जिल्हा रुग्णालय मध्ये रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इमारतीच्या पाठीमागे असलेल्या जनरेटर रुममधील सक्सेशन कॅाम्प्रेसर यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने मोठा आवाज झाला. रुग्णालयातील नवजात शिशुंच्या अतिदक्षता विभागाशी ही यंत्रणा होती. पाईप फुटल्यामुळे हा आवाज झाल्याचे समोर आले आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के.आर. श्रीवास यांनी या घटनेबाबत माहिती देतांना सांगितले की, तीन सक्शन युनिटपैकी एका युनिटमध्ये बिघाड झाल्याने मोठयाने आवाज झाला. त्यामुळे ड्यूटीवर असलेला नर्सिंग कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकारी,अग्निशमन विभाग, नाशिक महानगरपालिका आणि सरकार वाडा पोलीस स्टेशन यांना तात्काळ कळविले. टेक्नीकल टीमने येऊन तात्काळ समस्या सोडवली आहे. या सक्शन युनिटचा आणि ऑक्सिजनचा काही एक संबंध नसून ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना कुठल्याही प्रकारची इजा नाही. तसेच सक्शन युनिट आणि ऑक्सिजन हे दोघे वेगळी बाब असल्याने कोणताही गैरसमज करू नये अशी माहिती त्यांनी दिली.