नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराने न दिल्याच्या कारणावरून सिटीलिंक बसच्या वाहकांनी पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे गुरुवार पासून ही सेवा पूर्णक्षमतेने पुन्हा सुरु होणार आहे. दोन दिवसापासून ही सेवा ठप्प झाली होती.
प्रभारी मनपा आयुक्त यांनी कपंनीचे प्रतिनिधी व ठेकेदार यांची बैठक घेऊन दोन दिवसात मागील दोन महिन्याचे वेतन अदा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ठेकदाराने २१ जुलैला पगार अदा करणार असल्याचे मान्य केले. त्यानंतर वाहकांनी संप मागे घेतला. आता ही सेवा गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.
मंगळवारी सिटीलिंक बस सेवा विस्कळीत झाल्यानंतर प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. या बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक कार्यरत आहेत. याचा ज्या कंत्राटदाराकडे आहे त्याने मे आणि जून अशा दोन महिन्यांचे वेतन न दिल्याने ५०० वाहकांनी आंदोलन केले. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून सिटीलिंकच्या २०० हून अधिक बसची सेवा ठप्प झाली.