इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने नाशिक शहर व शहर हद्दीपासून २० किमी पर्यंत बससेवा पुरविण्यात येते. व दररोज हजारो नाशिककर या बससेवेचा लाभ घेतात. नियमित बस प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा याकरिता सिटीलिंकच्या वतीने अश्या प्रवाश्यांकारिता विविध प्रकारचे पास उपलब्ध करून देण्यात येतात. प्रवाश्यांना हे पास ऑनलाईन व ऑफलाईन अश्या दोनही पद्धतीने काढता येतात.
मात्र आता ऑफलाईन पद्धतीने पास काढण्याकरिता सिटीलिंकच्या वतीने नवीन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवाश्यांनी कार्यालयात जमा केलेल्या खासगी कागदपत्रांचा कोणताही गैरवापर होऊ नये. तसेच प्रवाश्यांच्या खासगी कागदपत्रांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सिटीलिंकच्या वतीने ऑफलाईन पद्धतीने पास काढणेकरीता आता नवीन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या नवीन प्रक्रीयेअंतर्गत आता प्रवाश्यांना “नाशिक सिटी बस”या सिटीलिंक ॲप्लिकेशनमध्ये “Apply Offline Pass” हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिक सिटी बस ॲप अपडेट केल्यास आपणास ॲप्लिकेशनच्या स्क्रीन वर “Apply Offline Pass” हा पर्याय दिसू शकेल. या पर्यायाच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपणास युनिक आय डी नंबर प्राप्त होईल. सदर युनिक आय डी नंबर व अपलोड केलेली केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रत सिटीलिंकच्या कोणत्याही अधिकृत पासकेंद्रावर दाखविल्यास पास ची रक्कम जमा केल्यास प्रवाश्यांना तात्काळ पास उपलब्ध करून देण्यात येईल.
मुख्य म्हणजे ही प्रक्रिया एकदाच म्हणजे नवीन पास काढणेकरीताच करावी लागणार आहे. एकदा ही प्रक्रिया केल्यानंतर पास नुतनीकरणावेळी पासधारक थेट पास केंद्रावर जाऊन पासचे नुतनीकरण करू शकतात.
तरी ऑफलाईन पद्धतीने पास काढणाऱ्या प्रवाश्यांनी या नवीन प्रक्रियेनुसारच पास काढावा याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. तसेच पास काढतेवेळी कोणतीही अडचण आल्यास कृपया ८५३००५७२२२ /८५३००६७२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
असा काढावा ऑफलाईन पास –
१) नाशिक सिटी बस या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन “Apply Offline Pass” या पर्यायावर क्लिक करावे.
२) त्यानंतर पासधारकाचे नाव, मधले नाव, आडनाव, संपर्क क्रमांक, ई मेल आयडी, आधार क्रमांक अशी आवश्यक माहिती भरावी.
३) पासचा प्रकार निवडावा.
४) आवश्यक दस्तेवज अपलोड करावेत. दस्तेवज खालीलप्रमाणे असावेत –
- विद्यार्थी पासकरीता – छायाचित्र, बोनाफाईड / CITINC फॉर्म, आधारकार्ड.
- लहान मुलांच्या पासकरीता – छायाचित्र, बोनाफाईड / CITINC फॉर्म, आधारकार्ड.
- ओपेन एन्डेड पासकरीता – छायाचित्र व आधारकार्ड.
- निश्चित मार्ग पासकरीता – छायाचित्र व आधारकार्ड.
५) वरील प्रक्रिया केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे.
६) यानंतर कार्यालयाकडून वापरकर्त्याच्या मोबाईलवर युनिक आय डी नंबर संदेशासह पाठविला जाईल.
७) सदर युनिक आय डी नंबर व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रत सिटीलिंकच्या कोणत्याही अधिकृत पास केंद्रावर दाखवून व पास ची रक्कम जमा केल्यास तात्काळ पास उपलब्ध करून देण्यात येईल.