इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) च्या वतीने नाशिक शहर तसेच शहर हद्दीपासून २० किमी पर्यंतच्या वेगवेगळ्या मार्गांवर बससेवा पुरविण्यात येते. व रोज लाखो प्रवासी या बससेवेचा लाभ घेतात. दररोज सिटीलिंक बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा याकरिता सिटीलिंकच्या वतीने पासेसची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ओपन एन्डेड, सर्व्हीस, विद्यार्थी, दिव्यांग पास अश्या वेगवेगळ्या प्रकारचे पासेस सिटीलिंकच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतात. प्रवाश्यांना हे वेगवेगळे पासेस काढता यावेत याकरिता सद्यस्थितीत सिटीलिंकचे सिटीलिंक मुख्य कार्यालय, निमाणी, नाशिकरोड अश्या ३ ठिकाणी पास केंद्र सुरु आहेत.
परंतु सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या परीक्षा तसेच उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सिटीलिंकच्या पास केंद्रांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहेत. सिटीलिंक मुख्य कार्यालय, निमाणी, नाशिकरोड हे तीनही पास केंद्र आता रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरु राहतील. त्याचप्रमाणे प्रत्येक रविवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी सदर पास केंद्र बंद राहतील याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी असे सिटीलिंपक प्रशासनाने सांगितले आहे.