नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक शहरात बससेवा पुराविणेकामी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ८ जुलै २०२१ रोजी पासून या कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरात तसेच शहर हद्दीपासून २० किमी पर्यंत प्रवाश्यांना बससेवा पुरविण्यात येतात. नाशिककरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सिटीलिंक बसेसमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करून या बससेवेचा लाभ घेत आहे.
दरम्यान सिटीलिंक मधून प्रवास करतेवेळी प्रवाश्याला काही गंभीर अडचण भासल्यास तात्काळ मदत मिळावी याकरिता सिटीलिंकच्या वतीने बसेसमध्ये तसेच नाशिक सिटी बस अँप्लिकेशन मध्ये इमर्जन्सी बटण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांत प्रवाश्यांकडून हे इमर्जन्सी बटण विनाकारण दाबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. केवळ कुतूहलापोटी किंवा अन्य कारणास्तव विनाकारण प्रवाश्यांकडून इमर्जन्सी बटण दाबल्यामुळे चालक, वाहक तसेच संबंधित कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.
खरच मदत आवश्यक असलेले प्रवासी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता आता विनाकारण इमर्जन्सी बटण दाबणाऱ्या प्रवाश्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. तरी पुढील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व गरजू प्रवाश्यांना वेळीच मदत मिळावी याकरिता कृपया बसमधील तसेच नाशिक सिटी बस अँप्लिकेशनमधील इमर्जन्सी बटण विनाकारण दाबू नये केवळ मदत आवश्यक असल्यासच सदर बटन दाबावे असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.