इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगर – येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , नाशिक जिल्हा महिला संघाने जळगाव व डीएआरसी क्लब, पुणे पाठोपाठ अहिल्या नगरवर देखील मोठा विजय मिळवला. नाशिकतर्फे श्रुति गीतेने नाबाद ६३ धावा व ३ बळी अशी जोरदार अष्टपैलू कामगिरी करत विजयात प्रमुख वाटा उचलला.
तिसऱ्या साखळी एकदिवसीय सामन्यात अहिल्या नगरला प्रथम फलंदाजी देत नाशिकच्या गोलंदाजांनी १२३ धावांत रोखले. श्रेया गडाखने सर्वाधिक ७० धावा केल्या. नाशिकतर्फे डावखु-या मध्यमगती श्रुती गीतेने ३ तर ऑफस्पिनर प्रियांका घोडकेने २ आणि रसिका शिंदे व लक्ष्मी यादवने प्रत्येकी १ बळी घेतला.
विजयासाठी १२४ धावांचा पाठलाग करणाऱ्या नाशिकने केवळ १ गडी गमावत, श्रुती गीते नाबाद ६३ व शाल्मली क्षत्रिय नाबाद ४१ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर २१.३ षटकांतच ९ गडी राखून लागोपाठ तिसरा मोठा विजय मिळवला.