नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिंद्रा कंपनीची XUV 500 कारमधून अवैधरित्या दारुची वाहतूक करणा-यांना पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करुन पकडले. त्यानंतर त्यांच्याकडून १ लाख ५७ हजार १० रुपये किमतीची दारु व कार जप्त केली.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहन क्रमांक GJ-19 AA-3388 या वाहनातून दोन इसम विनापास परमिटाशिवाय अवैधरित्या विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतूक करून पिंपळनेर कडून ताहराबाद कडे येत आहे अशी माहिती मिळाल्यावर अंतापुर चौफुलीवर सापळा लावण्यात आला. या सापळयात ही कार पिंपळनेर कडून ताहराबाद कडे येत असताना पोलीस उपनिरीक्षक रसाळ व पथकाने सापळा लावून अंतापुर चौफुली येथे जागीच पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहन चालक व त्याचा सोबतचा भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा प्रयत्न करत असताना ताहराबाद गावातील व करंजाड गावातील ग्रामस्थांनी पोलिसांची मदत करून नमूद संशयित कार पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. पोलिसांनी सदर वाहनाची झडती घेतल्यानंतर वाहनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी दारूच्या दारूबंदी गुन्ह्यांचा १ लाख ५७ हजार १०रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी सदरचा मुद्देमाल व सुमारे १० लाख रुपये किमतीची कार असा एकूण ११ लाख ५७ हजार १० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर कारचालक किसन लक्ष्मण गाणी वय ३० वर्षे राहणार धरम नगर रोड, सुरत (गुजरात राज्य) व त्याचे सोबतचा इसम उमेश किसन यादव वय २८ वर्षे राहणार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ अ, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वर नमूद दोन्ही इसमांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ हे करीत आहेत.