नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या सर्वांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात. संघर्ष करून आपण त्यातून बाहेर पडतो. पुन्हा नव्यानं आयुष्य सुरु होत. आता या गोष्टीला काय नाव द्यायचं ? राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक – दिग्दर्शक संदीप सावंत यांचा आगामी चित्रपट नासिककारांना थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याअगोदर बघायला मिळणार आहे. श्वास आणि नदी वाहते या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट ‘ ह्या गोष्टीला नावच नाही’ नेमका अशाच कुणाच्यातरी आयुष्याच्या कठीण प्रसंगाची कहाणी सांगतो.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या गोष्टीला नावच नाही हा मराठी चित्रपट शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, विद्या विकास सर्कल जवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही ओटीटी वर अथवा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याअगोदर ह्या चित्रपटाचे नाशिकमध्ये हे स्पेशल स्क्रिनिंग होणार असून चित्रपटानंतर लगेचच श्री प्रवीण मानकर हे चित्रपटाचे दिग्दर्शक श्री संदीप सावंत यांची मुलाखत घेणार आहेत.
सर्वांना मुक्त प्रवेश असलेल्या या चित्रपटाचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठान व दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीचे प्रवीण मानकर यांनी केले आहे.