इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील इतर देशांसोबतच आता चीनमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. गंभीर होत चाललेल्या परिस्थितीमुळे २७ शहरांमध्ये लॉकडाऊन लावावा लागला आहे. यामुळे सुमारे १६.५ कोटी लोकांना त्यांच्या घरातच बंदिस्त होण्याची वेळ आली आहे. अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे अन्नधान्य भरुन ठेवण्यासारखी पूर्वतयारीदेखील लोकांना करता आली नसल्याने मोठी हतबलता तिथे निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर लोकांना दिवसभर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तर काही ठिकाणी १ तास अन्नधान्य, जीवनावश्यक सामान खरेदीसाठी दिला जात आहे.
झिरो कोविड धोरणाखाली अत्याचार
महामारीच्या काळात चीन आपल्या झिरो कोविड धोरणाचे पालन करत आहे. या अंतर्गत लॉकडाऊन, मास टेस्टिंग, क्वारंटाईन आणि शहराच्या सीमा बंद करणे, लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करणे, विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा दंड आणि तुरुंगवास अशा कडक उपाययोजना केल्या जात आहेत. चीनच्या कठोरतेनंतरही कोरोना संसर्गाचा वेग कमी होत नाहीये. या कठोर निर्बंधांमुळे लोकांना उपाशी राहावे लागत आहे.
अचानक वाढ
गेल्या महिन्यापासून, म्हणजे मार्चपासून चीनमध्ये अचानकपणे प्रकरणे वाढू लागली, देशात संसर्गाचा वेग वाढू लागला जो २०२०च्या सुरुवातीस वुहानमधील सुरुवातीच्या उद्रेकापेक्षा वेगवान आहे. उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात ईशान्य जिलिन प्रांतावर वाईट परिणाम झाला होता. गुरुवारी, ३.५५ दशलक्षाहून अधिक रहिवाशांची एकत्रित लोकसंख्या असलेल्या चांगचुन आणि जिलिन शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की ते लवकरच लॉकडाउन सुलभ करण्यास सुरवात करतील. तथापि, ही प्रक्रिया कशी होईल किंवा कोणत्या परिस्थितीत लोकांना त्यांची घरे सोडण्याची परवानगी दिली जाईल हे स्पष्ट नाही.
तैवानमध्येही बाधित
तैवानमध्ये गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच कोरोनाचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तैवान सरकारने अलीकडेच त्यांचे झीरो कोविड धोरण काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा निर्बंध कठोर केले जाणार आहे. तैवानने आपल्या सीमा बंद केल्या आहेत आणि संसर्गाची संख्या कमी ठेवण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत.