नाशिक – अज्ञात चोरट्यांनी चार चाकी च्या मागील सीटवर ठेवलेले साडेपाच लाखांची रोकड काच फोडून पळवून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सूकर भोये (59, रा. राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटी, अशोक नगर, सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. भोये हे आज सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी सीबीएस येथील स्टेट बँकेच्या शाखेतून सात लाख रुपये रोख रक्कम काढली. ती घेऊन ते त्यांची चारचाकी कार (एम एच 15 जे आर 3039) ने त्यांच्या मुलाच्या सासुरवाडीला नवीन नाशकातील हेडगेवार नगर येथे आले. त्यांनी बँकेतून काढलेली रोकड ही गाडीच्या मागच्या सीटवर पिशवीत ठेवली होती. मुलाची सासुरवाडी असलेल्या घरात ते गेले असता त्यांना गाडीची काच फुटण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन बघितले असता एका दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या गाडीची ड्रायव्हर सिटच्या मागील बाजूची काच फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुचाकीवर बसलेल्या मागच्या व्यक्तीच्या हातात रोकड असलेली पिशवी दिसून आली. भोये व त्यांच्या मुलांनी त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. त्यावेळी पिशवी मधून दीड लाख रुपये खाली पडले. मात्र दोन्ही भामटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी भोये यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास सोनवणे अंमलदार दीपक वाणी करीत आहेत.