नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी टँकरमधून होत असलेली इंधन चोरी उघड पाडली. टँकर मधून दरवेळी सुमारे २०० ते ४०० लिटर डिझेल कमी येत होते. पण, कारण सापडत नव्हते. पण, त्यांनी हे कारण शोधून थेट ही चोरी पकडली.
त्यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिन्ही सरकारी ऑइल कंपनीच्या डेपोमुळे मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र बनलेले आहे. रोजच्या रोज येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र गालबोट लागले आहे ते म्हणजे टँकर मधून होणाऱ्या इंधन चोरीचे. ही चोरी सरळ सरळ पेट्रोल पंप चालकांच्या खिशातून होत असते. पेट्रोल संघटना याबाबत वेळोवेळी आवाजच उठवत असते. सुमारे तीन महिन्यापूर्वी तिन्ही ऑइल कंपन्यांचे अधिकारी ,डीलर संघटनांचे प्रतिनिधी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी ,मनमाड यांच्या कार्यालयात बैठक झालेली होती. या बैठकीत ऑइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अशा ट्रान्सपोर्टर्सवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत एका नवीन डीलरला येणाऱ्या टँकर मधून दरवेळी सुमारे २०० ते ४०० लिटर डिझेल कमी येत असल्याचे लक्षात आले. पण त्याचे कारण सापडत नव्हते कंपनीने सांगितलेल्या प्रोसिजर प्रमाणे चेक केले असता सर्व काही नीट भरायचे.
मात्र टँकर खालील केल्यानंतर तो अडिचशे ते चारशे लिटर कमी भरत असे. वारंवार कंपनीकडे याची तक्रार केली. एका ट्रान्सपोर्टचा संशया आला. बाकी ही डीलरला या ट्रान्सपोर्टचा असा अनुभव आला होता. सदर टँकर क्र.MH 18 AA 6022 (गौरी ट्रान्सपोर्ट) पंपावर आला असता कंपनी अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. ते देखील तातडीने हजर झाले व या टँकरचे इन्स्पेक्शन केले असता एक अनधिकृत असा पाईप टँकर मधून ड्रायव्हरच्या केबिनमध्ये गेलेला आढळला. या पाईपला बाहेरून वायरच्या कव्हरचे आवरण लावलेले होते व त्याचे तोंड ड्रायव्हरच्या केबिनमध्ये काढलेले होते .सदर तपासणीनंतर त्या टँकर वरती त्या ऑइल कंपनीने कठोर कारवाई केली व त्याला बंद केल्याचे समजते. मात्र नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने ऑइल कंपनीला पत्र लिहून याच पद्धतीने या ट्रान्सपोर्टच्या इतर गाड्यांची चौकशी करावी व कंपनीत येणाऱ्या इतर गाड्यांची ही वेळोवेळी कडक तपासणी करावी असे निवेदन दिले आहे. ऑइल कंपनीकडून याबाबत हलगर्जीपणा झाल्यास डीलर संघटना अतिशय तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा याद्वारे देत आहे.