विशेष प्रतिनिधी, जळगाव
राज्यात जात पंचायत विरोधी कायदा करण्यात आला असला तरी जात पंचायतींचा मनमानी कारभार सुरूच असल्याची बाब समोर आली आहे. चोपडा येथे एका महिलेला जात पंचायतीने चक्क थुंकी चाटण्याची शिक्षा दिली आहे. याप्रकरणी अंधश्रद्ध निर्मुलन समितीने आवाज उठविली असून या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.
जात पंचायतीचे सक्रीय पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले की, चोपडा येथील एका महिलेने साईनाथ नागो बाबर यांच्याशी २०११ मध्ये विवाह केला होता. मात्र पती दारू पिऊन मारहाण करत असल्याने २०१५ मध्ये तिने न्यायालयात रितसर घटस्फोट घेतला. पिडीत महिलेने न्यायालयात जाणे, तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला.
दरम्यान, पिडीत महिलेने २०१९ मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुर्नविवाह केला. असा पुर्नविवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतीने तिला एक लाख रुपयांचा दंड केला. महाराष्ट्रातील पंच एकत्र येऊन त्यांनी न्यायनिवाडा केला. तसेच, पिडीत परिवारास जात बहिष्कृत करण्याचाही ठराव केला. त्यांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. त्यांना मदत करणाऱ्या इतर चार परिवारासही बहिष्कृत करण्यात आले, असे चांदगुडे यांनी सांगितले.
पिडीत महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत रहावे, असा पंचांनी हेका कायम ठेवला. पुन्हा जातीत येण्यासाठी एक अमानुष शिक्षा दिली. ती म्हणजे पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे. विशेष म्हणजे कोरोना काळात ही शिक्षा दिली गेली गेल्याने हा प्रकार अतिशय संतप्त असल्याचे चांदगुडे यांनी म्हटले आहे.
पंचांच्या पायातील जोडे पिडीत महिलेने डोक्यावर घेऊन पंचाच्या पायावर नाक घासायचे, नंतर पिडीत महिलेचे तोंड काळे करण्याची शिक्षा देण्यात येईल, असे पंचांनी जाहीर केले. पिडीत महिला पंचाच्या दबावामुळे सध्या माहेरी राहत आहे. दुसऱ्या नवऱ्यालाही जात पंचायतीने धमकी दिली आहे. न्यायालयाचा निकाल मानायचा असेल तर पिडीतेच्या कुटुंबाने धर्म बदलावा, असा हुकूम पंचांनी काढला आहे, असेही चांदगुडे म्हणाले.
पिडीत महिलेसोबत आई व आजी राहत असून ते भिक्षा मागून पोट भरतात. परंतु कोरोना काळात ते पण बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. असे असतांना जात पंचायतला द्यायला त्यांनी शेकडा पाच टक्क्याने सावकाराकडून पैसे आणले. आता पंचांना देण्यासाठी आणखी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या मदतीला धावून आली आहे. समितीचे चांदगुडे, दिगंबर कट्यारे, आयुब पिंजारी व जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे हे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.