हुबळी (कर्नाटक) – रेल्वेच्या वातानुकूलित बोगीतून प्रवासी प्रवास करत असल्याचे तुम्ही रोजच पाहात असाल. परंतु चॉकलेट आणि नुडल्स एका जागेवरून दुसर्या जागेवर पोहोचवण्यासाठी रेल्वेच्या वातानुकूलित बोगीचा वापर होईल, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना? रेल्वेच्या हुबळी विभागाने हा विचार कृतीत उतरवला आहे.
रेल्वेच्या दक्षिण पश्चिम हुबळी विभागाने चॉकलेट आणि खाण्या-पिण्याच्या इतर वस्तू गोव्याच्या वास्को दी गामा येथून दिल्लीला पोहोचविण्यासाठी वातनुकूलित बोगीचा वापर केला आहे. एका विशेष तापमानात वस्तू ठेवून दुसर्या जागी पोहोचवणे हे वातानुकूलित बोगी वापरण्याचे कारण होते. रेल्वेने प्रवाशांच्या वातानुकूलित बोगींचा वापर केला.
दिल्लीला पोहोचवलेल्या वस्तूंचे वजन १६३ टन होते. रेल्वेच्या सर्व १८ वातानुकूलित बोगीत या वस्तूंना ठेवण्यात आले होते. ह्या वस्तू ए.व्ही.जी. लॉजिस्टिक कंपनीच्या होत्या. वातनुकूलित पार्सल सेवेद्वारे रेल्वेने एका झटक्यात १२.८३ लाख रुपये कमावले आहेत.
हुबळीच्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिटने आपली पारंपरिक वाहतूक व्यवसायाची सीमा ओलांडून या नव्या संकल्पनेवर अंमलबाजवणी केली आहे. रेल्वे विभाग ग्राहकांना चांगली सुविधा देण्यास तप्तर आहे. कमी खर्च आणि सुरक्षित वातावरणामुळे ग्राहक त्यांच्या सेवेला प्रतिसाद देत आहेत, असे रेल्वेचे हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी सांगितले.
हुबळी विभागाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे. ऑक्टोबर २०२० पासून आतापर्यंत या विभाहाने पार्सलच्या वाहतुकीतून एक कोटीहून अधिक कमाई केली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये विभागाने १.५८ कोटी रुपये कमावले. चालू आर्थिक वर्षात या विभागाने ११.१७ कोटी रुपये कमावले आहेत.