मुंबई – चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आहे. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मराठी भाषा विभागाशी निगडित सर्व संस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच त्यांनी भेट देण्यात येणाऱ्या ग्रंथसंपदेची माहिती घेतली.