अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
चीनची राजधानी असलेल्या बिजींगमध्ये येत्या ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक्स २०२२ स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणारे बहुतांश खेळाडू बर्नर फोनचा वापर करणार आहेत. अनेक देशांनी यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. हा फोन नेमका काय आहे, त्याचा खेळाडूंना काय फायदा होणार, असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
पाश्चात्य देशांमधील राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांनी खेळांडूंना बर्नर फोन वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांचा नेहमीचा वापरात असणारा फोन घरीच सोडून देण्याचा सल्लाही दिला आहे. सध्या सायबर सुरक्षेचे आव्हान सगळीकडेच असल्याने खेळांडूंना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, आपल्या खेळांडूंशी गुप्त चर्चाही बर्नर फोनद्वारे करणे त्या त्या देशाच्या अधिकाऱ्यांना शक्य होणार आहे.
‘बर्नर फोन’ हा एक स्वस्त प्रीपेड सेल फोन आहे. जो तुम्ही वापरल्यानंतर नष्ट करू शकता किंवा फेकून देऊ शकता. असे फोन अशा लोकांकडून वापरला जातो ज्यांच्या गोपनीयतेला धोका असतो. लोक गोपनीयतेच्या कारणांसाठी, शेवटचा उपाय म्हणून किंवा आपत्कालीन परिस्थितीत बर्नर फोन वापरतात.
राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांनी सांगितले की, ते त्यांच्यासाठी खेळाडू आणि त्यांचे कर्मचारी यांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्याही धोक्याचा सामना त्यांना करावा लागू नये, यासाठी ही सूचना आम्ही त्यांनी दिली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपातील उपकरणे त्यांना पुरवली जाणार आहेत. त्यातच बर्नर फोनचा समावेश असणार आहे. युनायटेड स्टेट्स ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीने म्हटले आहे की, खेळाडूंशी निगडित प्रत्येक मजकूर, ईमेल, ऑनलाइन भेट आणि कोणत्याही एप्लिकेशनचा वापर याच्याशी छेडछाड केली जाऊ शकते. ती टाळण्यासाठी यापासून दूर राहणेच चांगले आहे.
अमेरिकेने आपल्या खेळाडूंना बीजिंगमध्ये डिस्पोजेबल लॅपटॉप आणि फोन भाड्याने घेऊन त्याचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच खेळाडूंना चीनमध्ये प्रवास करण्यापूर्वी आणि नंतर वैयक्तिक डिव्हाइसेसमधून सर्व डेटा हटवण्यास सांगितले आहे. जर ते त्यांचे वैयक्तिक डिव्हाइस घेऊन जात असतील तर त्यातील सगळी महत्त्वाची माहिती डिलीट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या डिव्हाइसवर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) इन्स्टॉल करण्याची शिफारस देखील केली आहे.
अमेरिका इतकी काळजी घेत असताना, स्लोव्हेनिया आणि स्लोव्हाकियाच्या ते संघातील सदस्यांना तात्पुरती उपकरणे पुरवणार नाहीत, असे जाहीर केले आहे. तसेच क्रोएशियाने ते त्यांच्या खेळाडूंना त्यांची असलेली उपकरणे वापपरण्याची परवानगी देणार आहे. तर सर्बियाने कोणत्याही अतिरिक्त सायबर सुरक्षा उपायांचे नियोजन केलेले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बर्नर फोन हा प्रकार अमेरिकन खेळाडूकडेच दिसून येणार आहे.