विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतासोबत कुरापाती करण्याचे काम चीन अनेक दशकांपासून करीत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये पाकीस्तानच्या सोबत राहून या कुरापाती जास्तच वाढल्या आहेत. आता भारतीय टेलिकॉम कंपन्या आणि अनेक सुरक्षा कॉन्ट्रॅक्टर्स चीनच्या निशाण्यावर आहेत. एका सायबर थ्रेट्स इंटेलिजन्स कंपनीने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेतील एका रिपोर्टमध्येही चीनच्या छुप्या ऑपरेशन्सचे पुरावे सापडतात. पिपल्स लिबरेशन आर्मीच्या एका विशिष्ट्य युनिटशी चीनचे हे अभियान जुळलेले आहे.
अमेरिकेतील मुख्यालयांतर्गत येणाऱ्या ‘रेकॉर्डेड फ्यूचर‘च्या वतीने हा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यात या वर्षाच्या सुरुवातीला वीज आणि बंदरांच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सोयी-सुविधांना टार्गेट करणाऱ्या चीनी सायबर संचालनाचे पुरावे देणारी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.
मार्चमध्ये उघडकीस आलेल्या या युनिटला ‘रेडइको‘ असे नाव देण्यात आले. तर नव्या समूहाची ओळख रेडफॉक्सस्टोटच्या रुपात करण्यात आली आहे. भारतात विशेषत्वाने गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन दूरसंचार कंपन्या आणि तीन सुरक्षा कॉन्ट्रॅक्टर्स आणि अनेक अतिरिक्त सरकारी आणि खासगी क्षेत्रातील संघटनांना यशस्वीरित्या टार्गेट करणाऱ्या समूहाचा चेहरा उघड झाला आहे.
ड्रॅगनची रणनिती
भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगनने ही रणनिती आखली. ज्यावेळी दोन्ही देशांमधील वाद टोकाला गेला होता त्यावेळी हे धोरण अधिक यशस्वीरित्या राबविण्यात आले. त्यावेळी चीनच्या निशाण्यावर एनटीपीसी प्लान्ट्सही होते. सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून भारताला शह देण्याची चाल चीन गेल्या काही काळापासून खेळत आहे. २०१४ पासून त्यास अधिक वेग आला आहे. भारतातील टेलिकॉम व एअरोस्पेस या क्षेत्रांवर अधिक लक्ष्य केंद्रित केेले आहे.