बीजिंग – चीनमधून प्रादुर्भाव झालेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झालेले असताना आता त्यांच्या रॉकेटने जगाची चिंता वाढवली आहे. चीनचे लाँग मार्च ५ बी हे रॉकेट अंतराळात भरकटले असून, ते पृथ्वीवर कधी कोसळू शकते. हे यान पृथ्वीच्या कक्षेत ८ मे रोजी प्रवेश करू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अमेरिका सरकारकडून एक इशारा देण्यात आलेला आहे. २१ टन वजनाचे हे रॉकेट आठ मेच्या दरम्यान कधीही पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकते. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची संभाव्य तारीख सांगितली, परंतु ते पृथ्वीच्या कोणच्या भागात कोसळेल हे सांगणे कठीण असल्याचे म्हणाले.
स्पेस ट्रॅकवर या रॉकेटच्या स्थितीबाबत नियमित माहिती दिली जात आहे. याबाबत जशी माहिती मिळेल तशी ती सरकार उपलब्ध करून देत आहे. १०० फूट उंच आणि १६ फूट रूंद रॉकेटबाबत इतर सॅटेलाइट ट्रॅकर्सही माहिती देत आहेत. याला २०२१-०३५ बी असे नाव देण्यात आले आहे.
चार मैल म्हणजे ६.४ किमी प्रतिसेकंद या वेगाने ते येत आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माईक हावर्ड म्हणाले, अमेरिकेच्या स्पेस कमांडकडून चीनच्या रॉकेटवर सलग नजर ठेवली जात आहे. परंतु पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या काही तासांपूर्वीच आपल्याला समजू शकणार आहे.
जीवित आणि वित्तहानीचा धोका
अंतराळ तज्ज्ञ जोनाथन मेगडोबल म्हणाले, मागील वेळी लाँग मार्च ५ बी रॉकेट अंतराळात सोडल्यानंतर त्याच्या धातूंचे मोठे तुकडे आकाशात बाहेर निघाले होते. ते तुकडे पृथ्वीवर कोसळताना आयव्हरी कोस्ट येथील इमारतींचे नुकसान झाले होते. अनेक तुकडे अवकाशातच जळून गेले. हे रॉकेट न्यूयॉर्क आणि मॅड्रिड किंवा दक्षिण चिली किंवा न्यूझीलंडकडून पृथ्वीवर कोसळू शकते. रॉकेटचा मार्ग निश्चित नसल्याने हाच अनुमान लावला जात आहे.पृथ्वीवर कोसळण्यापूर्वी या रॉकेटचा बहुतांश भाग जळून जाण्याची शक्यता आहे. समुद्र किंवा एखाद्या मोकळ्या जागेतच ते कोसळण्याची शक्यता आहे. परंतु तरीही जीवित आणि वित्तहानीचाही धोका कायम आहे.
तर मोठे नुकसान शक्य
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून खूपच धिम्या गतीने पंरतु अनिश्चित पद्धतीने पृथ्वीकडे येत आहे. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार्या रॉकेटपैकी हे सर्वात बेकाबू झालेले रॉकेट आहे. छोट्या विमानाच्या दुर्घटनेसारखेच हे रॉकेट कोसळू शकते. परंतु गर्दीच्या ठिकाणी कोसळले तर मोठे नुकसान होऊ शकते.