नवी दिल्ली – भारतात एकीकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात पेगॅसस हेरगिरी वाद, कृषी कायद्यांविरुद्ध शेतकर्यांचे आंदोलन, महागाई दर आणि देशाची अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे ईशान्येकडील तिबेटच्या सीमेवर सर्वकाही सुरळीत चालले आहे असे नाही.
अरुणाचल प्रदेशच्या ११२६ किमी लांब सीमा तिबेटला लागूनच आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग मानतो. अरुणाचलला भारताचा भाग म्हणून चीनने कधीच स्वीकारले नाही. गेल्या वर्षी गलवान खोर्यात झालेल्या संघर्षानंतर चीनने अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या सीमेवर हालचाली वाढविल्या आहेत. धरणापासून महामार्ग आणि रेल्वे मार्गाची बांधणी असो किंवा भारतीय सीमेत घुसून युवकांचे अपहरणाचे प्रकरण असो चीनच्या पिपुल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. बेरोजगारी आणि कनेक्टिव्हिटीसारख्या समस्यांवर अंकुश लावण्यासाठी मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा वाढविण्याच्या कामांना गती देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्या पासीघाट येथील आमदार निनोंग इरिंग यांनी दावा केला आहे, की चीनची पिपुल्स लिबरेशन आर्मी अरुणाचल प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील युवकांना भरती करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अरुणाचलला लागून तिबेटच्या भागातून भरती केली जात आहे. केंद्रीय गृह आणि संरक्षण मंत्रालयाने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन आवश्यक पावले उचलावेत अशी मागणी त्यांनी केली. इरिंग सांगतात, तिबेट सीमेशी जोडलेल्या भागात राहणार्या निशी, आदी, मिशिमी आणि ईदू जाती आणि चीनच्या लोबा जमातीच्या लोकांमध्ये खूपच समानता आहेत. त्यांची बोली, राहाणीमान, त्यांचे पोषाख सारखाच आहे.
चीनकडून सीमावर्ती भागातील बिसा, गोहलिंग आणि अनिनी भागात घरे आणि रस्त्यांची कामे केली जात असल्याने स्थानिक लोक प्रभावित होण्याच्या शक्यतेला नकार दिला जाऊ शकत नाही. या मुद्द्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले. इरिंग यांच्या वक्तव्यावर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
चीनने सीमेच्या २० किमीच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकाम केले आहे. तिबेटची राजधानी ल्हासाच्या जवळ नवी वेगाने धावणारी रेल्वेसुद्धा सुरू केली आहे. त्यापूर्वी चीनने एका मोठ्या महामार्गाचे कामही पूर्ण केले आहे. सरकारी अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका वर्षात चिनी सैनिकांनी सीमापार केल्याच्या अनेक घटना घडल्याच्या सूचना मिळाल्या आहेत. दुर्गम भाग असल्याने प्रत्येक ठिकाणी लष्कर तैनात केले जाऊ शकत नाही. तसेच राजधानीपर्यंत सूचनाही उशिराने पोहोचतात. भारताने नुकतीच पूर्वेकडील अंजावमध्ये लष्कराच्या तुकडीची अतिरिक्त कुमक पाठविली आहे.
आरोप-प्रत्यारोप
सीमेवर चीनच्या सैनिकांकडून नेहमी होणार्या अतिक्रमाणाची समस्या सोडविण्याऐवजी भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. ही समस्या मागील काँग्रेस सरकारच्या काळातील आहे, असा आरोप भाजप खासदार तापिर गाओ यांनी केला आहे. सीमांभागात चीनकडून ८० च्या दशकातच मार्ग तयार करण्यास सुरुवात केली आहे. राजीव गांधी सरकारच्या कार्यकालात चीनने तवांगमध्ये सुमदोरोंग चू खोर्यात कब्जा केला होता. सीमेपर्यंत रस्ता बनिवण्याकडे तत्कालीन सरकारने लक्ष दिले नव्हते. परिणामी तीन ते चार किमी रस्ता बफर झोन झाला आहे. त्यानंतर चीनने त्यावर कब्जा केला आहे.