विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून यामागे चीनचे कारस्थान असल्यावरून चर्चांना उधाण आले होते. चीनच्या लष्करी शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांचा एक गोपनीय दस्तऐवज अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हाती नुकताच लागला आहे. त्यानुसार, चीनचे वैज्ञानिक २०१५ पासून कोरोना विषाणूला प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या घातक जैविक अस्त्रामध्ये रूपांतरित करण्याच्या शक्यतेवर काम करत होते. तिसरे महायुद्ध जैविक अस्त्रांद्वारेच लढले जाणार आहे, असे त्यांचे मानणे आहे. कोरोना महामारीचा प्रसार होण्यामध्ये आपला हात नसल्याचे चीनने म्हटले असले तरी, चीनच्या कटकारस्थानाची पोलखोल करणारे असे अनेक तथ्य समोर आले आहेत.
वुहानच्या प्रयोगशाळेत अनेक पुरावे
चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये कोरोना विषाणूवर अनेक दिवसांपासून संशोधन सुरू आहे. कोरोना महामारीची सुरुवात झालेल्या बाजारापासून ही प्रयोगशाळा केवळ १६ किलोमीटर अंतरावर आहे. सध्याचा विषाणू चीनने जाणूनबुजून पसरविल्याची गोष्ट भलेही मान्य करणार नाही, परंतु प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर पडल्याची शक्यता कोणतेच पूर्णपणे वैज्ञानिक नाकारत नाहीयेत.
प्रयोगशाळेतून विषाणू लीक
२००४ मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर आला होता. त्यावेळी ९ लोकांना संसर्ग झाला होता आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. चीनमध्ये अशी प्रकरणे खूपदा समोर आलेली आहेत. प्रयोगशाळेत सुरक्षा व्यवस्था कितीही भक्कम असो, प्रयोगादरम्यान संसर्गाच्या इंजेक्शनच्या संपर्कात आल्यास किंवा प्रयोगातील उंदिर किंवा इतर प्राण्यांनी चावा घेतल्यास हा विषाणू बाहेर फैलावू शकतो.
वटवाघुळापासून माणसापर्यंतचा प्रवास
सध्या ज्या विषाणूच्या स्ट्रेनमुळे महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे, तो वटवाघुळामध्ये आढळणार्या विषाणूशी मिळताजुळता आहे. हाच विषाणू स्वतःमध्ये बदल घडवून माणसांपर्यंत पोहोचला आहे, असे बोलले जात आहे. परंतु अनेक वैज्ञानिक या संज्ञेला फेटाळत आहेत. कोणताच विषाणू प्राण्यांमधून थेट मानवाच्या शरीरात पोहोचून इतका मोठा संसर्ग करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जर विषाणूने बदलांचा एवढा मोठा प्रवास केला असेल, तर मधल्या साखळ्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.