मुंबई – चीन एका मोजूनमापून राबविण्यात येणा-या रणनीतीअंतर्गत भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवत असल्याचे निदर्शनास आले आहे. एका भारतीय थिंक टँकतर्फे नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणुकीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. अहवालानुसार, अलिबाबा, टेनसेंट, झिओमी (शाओमी) या चिनी कंपन्यांनी अनेक भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. इतकेच नव्हे, तर अनेक कंपन्या सीएसआर निधीतून भारतात चीनसाठी लॉबिंग करण्यावर खर्च करत असून, त्यामध्ये त्यांचे भारतविरोधी कामे उघड झाली आहेत.
लॉ अँड सोसायटी अलायन्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘मॅपिंग चायनीज फुटप्रिंट अँड इन्फ्लुएन्स ऑपरेशन इन इंडिया’ या अहवालात म्हटले आहे की, २०१५ ते २०२० दरम्यान चिनी कंपन्यांनी भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये सात अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. झिओमी कंपनीने चीनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपला सीएसआर फंड भारतात खर्च केले आहे. अलिबाबाने पेटीएम मॉल, स्नॅपडिल, झोमॅटो, एक्सप्रेबीईजसह ११ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. टेनसेंट या मोठ्या कंपनीने स्वामी, फ्लिपकार्ट, मॅक्सप्लेअर, सिटीमाला, खाताबुकसह १६ कंपन्यांमध्ये तसेच झिओमीने हंगामा डिजिटल मीडिया, ओये रिक्शा, जस्टमनीसह सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. २०२० मध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहीम सुरू केली होती. तेव्हा अलिबाबा कंपनीतर्फे भारतीय लघु व्यवासायिकांसाठी गो ग्लोबल कार्यक्रमाचे व्हर्च्युअल आयोजन केले होते. त्यामध्ये २२०० हून अधिक व्यावसायिक मंचांनी सहभाग घेतला होता. हुआई आणि जेडटीआय या चिनी टेलिकॉम कंपन्यांकडून वाढत्या हस्तक्षेपाबाबतही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. ह्या कंपन्या देशात ५ जी ट्रायल करण्यात पुढाकार घेत आहेत. बीएसएनएलचे ४४ टक्के उपकरणे जेडटीई तसेच ९ टक्के हुआईकडून घेण्यात आले आहेत. भारतीय मोबाईल कंपन्यांच्या दोन संघटना या कंपन्यांच्या बाजूने उभ्या असल्याचे निदर्शनास आले आहे. हुआई ही कंपनी चीनचे लष्कर पीएलएशी निगडित असल्याचेही बोलले जात आहे. या कंपनीच्या प्रमुखपदी लष्करी अधिका-यांची नियुक्ती आणि २०१७ च्या वार्षिक अहवालानुसार, त्यांना २३ कोटी डॉलरचे देण्यात आले आहेत. झिओमीसारख्या कंपन्या भारतविरोधी अजेंडा राबवित आहेत. सीएसआर फंडाचा दुरुपयोग केला जात आहे. झिओमीने गेल्या वर्षी भारताच्या नकाशातून अरुणाचल प्रदेशाला वगळले होते.