नवी दिल्ली – लडाखजवळील सरहद्दीवर भारताने दिलेले आक्रमक प्रत्युत्तर चीनला चांगलेच खुपलेले आहे. त्यामुळे कटकारस्थान करून चीन पाकिस्तानला ड्रोनचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीन आपले मनसुबे रचत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या असून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
चीनच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ड्रोन मिळविणारा पाकिस्तान अप्रत्यक्ष युद्धामध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. रात्री आणि दिवसा दोन्ही वेळा कारवाईस सक्षम असलेले अत्याधुनिक ड्रोन चीन आणि तुर्कीकडून पाकिस्तानला मिळत असल्याचे ठोस पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे आहेत. या ड्रोनची रडारावर नोंद होणे कठीण आहे.
जम्मूमध्ये घडलेली घटना भारतीय सुरक्षा यंत्रणांची डोळे उघडणारी ठरली आहे. ड्रोनद्वारे हत्यारे पाठविण्याच्या घटनांनंतर आता ड्रोनद्वारे हल्लेही करण्यात येत आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या धोरणांतर्गत पाकिस्तान दहशतवादी संघटनांना अत्याधुनिक ड्रोन पुरवत असेल, तर सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहणार आहे. जम्मूच्या घटनेनंतर दहशतवादी ड्रोन हल्ल्यांच्या क्षमतेने सज्ज असल्याच्या शक्यतांना अधिक बळ मिळाले आहे.
पाकिस्तानला चीनशिवाय तुर्कीकडून नाटोकडून वापरण्यात येणारे ड्रोन मिळाले आहेत. चीन पाकिस्तानचा एखाद्या प्याद्यासारखा वापर करत आहे. चीनने नवे तांत्रिक क्षमतेचे घातक शस्त्रे आणि उपकरणे पाकिस्तानला पुरविले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता कायम ठेवणे हाच चीनचा उद्देश आहे. जेणेकरून पाकिस्तानजवळील सीमेवर भारत कायम व्यस्त राहील. युद्धबंदी झाल्यानंतरही पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देणे सुरूच ठेवले आहे.
अत्याधुनिक ड्रोन मिळविण्याचे पाकचे प्रयत्न
पाकिस्तान अत्याधुनिक सीएच-४ यूसीएव्ही, अनमँड कॉम्बॅट एरिअल व्हेहिकलसुद्धा चीनकडून मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. हा लढाऊ ड्रोन खूपच घातक असल्याचे मानले जात आहे. या ड्रोनची वेगाने हल्ले करण्याची आणि हेरगिरी करण्याची क्षमता खूपच जास्त आहे. ३५० किलो वजनाचे शस्त्रे वाहून नेण्याचीही त्याची क्षमता आहे. रात्री आणि दिवसा दोन्ही वेळात तो चांगले काम करू शकतो.
चीनचे पडद्यामागून कटकारस्थान
पाकिस्तानच्या नौदलाला भक्कम करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत. पडद्यामागून कट रचण्याचे प्रयत्न चीन करत आहे. काश्मीरमध्ये पाक समर्थित दहशतवादात कोणतीच कमतरता राहू नये यासाठी चीनकडून पाकिस्तानला सर्वतोपरी मदत दिली जात आहे.
पाककडे अत्याधुनिक स्टेल्थ ड्रोन
सीमा सुरक्षा दलाचे माजी अतिरिक्त महासंचालक पी. के. मिश्रा सांगतात, पाकिस्तानकडे अत्याधुनिक पद्धतीचे स्टेल्थ ड्रोन आहेत. चीन आणि तुर्की या दोन्ही देशांकडून पाकला ड्रोनचा पुरवठा केला जात आहे. हे ड्रोन कमांड आणि कंट्रोल सिस्टिमच्या माध्यमातून क्षेपणास्त्रांसारखे हल्ले करून माघारी जाण्यास सक्षम आहेत. हत्यारे पाठविण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर होत असल्याचे आधीच उघड झालेले आहे. हे ड्रोन पाडले जातात. परंतु स्टिल्थ ड्रोन सर्वात धोकादायक आहेत. जम्मूमध्ये याच पद्धतीच्या ड्रोनचा वापर झाल्याची शक्यता आहे.