ढाका – चार देशांच्या या छोट्या क्लबमध्ये (क्वाड) बांगलादेश सहभागी होत असताना त्यामुळे चीनची चिंता मात्र वाढत आहे. याबद्दल चीनने अनेकवेळा नाराजी व्यक्त केली असली तरी आता बांगलादेशने यात सामील होऊ नये, असा इशारा दिला आहे. बांगलादेश या चीनविरोधी युतीमध्ये सामील झाल्यास द्विपक्षीय संबंधांना बाधा होईल. मात्र, चीनच्या इशाऱ्यांनंतरही बांगलादेशने प्रत्युतर देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंग यांच्या ढाका दौर्यानंतर बांगलादेशातील चिनी राजदूत ली जिमिंग यांनी असा इशारा दिला. बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद यांच्याशी झालेल्या बैठकीत जनरल फेंग यांनी आग्रह धरला की, दोन्ही देशांनी दक्षिण आशियामध्ये सैनिकी युती करण्याच्या बाह्य शक्तींनी केलेल्या प्रयत्नांना संयुक्तपणे विरोध करायला हवा. मुत्सद्दी प्रतिनिधींच्या संघटनेने आयोजित केलेल्या डिजिटल बैठकीत ली म्हणाले की, चार देशांच्या या छोट्या क्लबमध्ये (क्वाड) सामील होणे बांगलादेशसाठी निश्चितच चांगले ठरणार नाही, कारण यामुळे द्विपक्षीय संबंधांना मोठे नुकसान होईल.
चीनी राजदूतांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमीन म्हणाले की, बांगलादेश संतुलित परराष्ट्र धोरणाचे अनुसरण करतो आणि या तत्त्वांच्या अनुषंगाने आम्ही काय केले पाहिजे ते ठरवले जाईल. आम्ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. आम्ही आमचे परराष्ट्र धोरण स्वतःच ठरवतो. तथापि, एखादा देश आपली भूमिका स्पष्टपणे सांगू शकतो. त्याचवेळी क्वाडच्या कोणत्याही सदस्याने अद्याप बांगलादेशशी संपर्क साधलेला नाही.
क्वाड म्हणजे काय
चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे ‘क्वाड’ होय. याची स्थापना २००७ साली झाली होती. यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ही संघटना स्थापन केली गेली असली तरी चीन यामुळे फारच त्रस्त आहे. कारण इतर मुद्द्यांसह समुद्रातील चीनच्या वाढत्या आक्रमणासही लगाम घालण्यासाठी ही संघटना सज्ज आहे. यावर्षी मार्चमध्ये या संघटनेच्या चार देशांमध्ये शिखर बैठक झाली होती.