बीजिंग – आपल्या देशात एखाद्या सार्वजनिक समारंभाची चांगली सुरुवात होत असतानाच त्यात माइक बंद पडणे किंवा साऊंड सिस्टिम मध्ये गडबड गोंधळ उडणे ही एक प्रकारे सामान्य बाब मानली जाते. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय येऊन सर्वांचाच विरस होतो. गल्ली-बोळातील एखाद्या कार्यक्रमात असे घडले तर हे आपण समजू शकतो. परंतु जगातील सर्वोच्च संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीतच असे घडले तर. हो हे खरे आहे. मुजोर चीननेच असा खोडसाळपणा केला आहे.
बीजिंगमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत हा प्रकार घडला. त्यामुळे सर्व जगभरातून आलेले वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (BRI) आणि त्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पा CPEC ला कडाडून विरोध करताना भारतीय मुत्सद्दी व सचिव प्रियंका सोहनी यांचा माइक अचानक बंद पडला. चीनच्या या वादग्रस्त प्रकल्पाची पोलखोल सोहनी या करीत होत्या. तसेच, भारताचा आक्षेप नोंदवत होत्या.
नेमके भारतीय मुत्सद्दीच्या संबोधनादरम्यानच माईक अचानक का बंद पडला या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. कारण चीन स्वतः या बैठकीचे आयोजन करत आहे. सभेच्या मध्यभागी माईक अचानक बंद होणे आणि त्यामुळे झालेल्या गोंधळामुळे तेथील कर्मचाऱ्यांमध्येच नव्हे तर अधिकाऱ्यांमध्येही भीतीची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर माईकची दुरुस्ती व निराकरण करण्यास कित्येक मिनिटे लागली. विशेष म्हणजे, भारतीय मुत्सद्दी सोहनी यांचे भाषण पूर्ण झाले नसतानाच पुढच्या वक्त्याचा व्हिडिओ स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्यामुळे आणखीनत संभ्रम सुरू झाला. भारतीय मुत्सद्दीला बोलूच द्यायचे नाही की काय, अशी शंका यामुळे उपस्थित होत आहे.
यूएनचे अंडर-सेक्रेटरी-जनरल लियू झेनमिन, चीनचे माजी उप-परराष्ट्र मंत्री यांनी हा प्रकार काही काळाने थांबवला. तसेच झेनमिन यांनी भारतीय मुत्सद्दी आणि येथील भारतीय दूतावासातील द्वितीय सचिव प्रियंका सोहनी यांना आपले भाषण चालू ठेवण्याचा आग्रह केला. तसेच कॉन्फरन्स रूममध्ये माईक प्रणाली दुरूस्त केल्यानंतर झेमिन म्हणाले की, प्रिय सहभागी अधिकाऱ्यांनो, आम्ही दिलगीर आहोत. आम्हाला काही तांत्रिक अडचणी येत होत्या आणि पुढील स्पीकरचा व्हिडिओ सुरू केला गेला. यासाठी मी दिलगीर आहे. त्यानंतर भारतीय मुत्सद्दीने पुन्हा एकदा कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपले भाषण पूर्ण केले.
सोहनी म्हणाल्या की, बीआरआयचा उद्देश चीनचा प्रभाव वाढवणे असा आहे. दक्षिण-पूर्व आशिया, मध्य आशिया, आखाती प्रदेश, आफ्रिका आणि युरोपला जमीन आणि समुद्री मार्गांच्या नेटवर्कद्वारे चीनशी जोडणे आहे. परंतु कोणताही देश सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या मुख्य चिंतांकडे दुर्लक्ष करणाऱ्या उपक्रमाचे समर्थन करू शकत नाही, असेही सोहनी यांनी सभागृहाला ठासून सांगितले.