बीजिंग – चीनकडून भारताची नेहमीच अडवणूक करण्यात येते, असा इतिहास आहे. आता देखील कोरोना काळात चीनने भारताबाबत दुटप्पी भूमिका घेतलेली दिसून येते. एकीकडे चीन कोरोना विषाणूच्या साथीवर लढायला मदत करण्याची तयारी दाखवत आहे, तर दुसरीकडे या देशाने वैद्यकीय पुरवठ्यांचा मार्गही अडवला आहे.
चीनची सरकारी विमान कंपनी सिचुआन एअरलाइन्सने येत्या १५ दिवसांकरिता आपल्या मालवाहू विमानांची उड्डाणे भारताला स्थगित केली आहेत. त्यामुळे चीनी खासगी व्यापाऱ्या कडून ऑक्सिजन सामुग्री साठा आणि इतर वैद्यकीय वस्तू पाठविण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होईल.
भारतात कोरोनाचे प्रकरण जसजसे वाढत गेले तसतसे बीजिंगकडून पाठिंबा व सहकार्याची ऑफर देण्यात आली, परंतु सिचुआन एअरलाइन्सने विरोधी पाऊल उचलले आहे. सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे की, चीनकडून ऑक्सिजन केंद्राच्या व्यवसायाच्या प्रयत्नात आम्ही सहा मार्गांवर उड्डाणे थांबविली आहेत. यामध्ये शियान-दिल्ली मार्गाचाही समावेश आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, भारतातील साथीच्या परिस्थितीचा विचार करता हा निर्णय पुढील १५ दिवसांसाठी घेण्यात आला आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. मात्र भारतातील उड्डाणे आमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची असतात असेही या पत्रात म्हटले आहे. उड्डाणे निलंबित झाल्यामुळे आमच्या कंपन्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, परंतु या परिस्थितीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्हाला आशा आहे की विक्री एजंट परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतील.
मालवाहतूक उड्डाणे पुढे ढकलल्यामुळे चीनकडून ऑक्सिजनची सामुग्री खरेदी करण्याचा प्रयत्न करणारे भारतीय उद्योजक, एजंट आणि मोठ्या ग्राहकांना धक्का बसला आहे.आता ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या किंमती ३५ ते ४० टक्क्यांनी वाढविल्याच्याही तक्रारी आहेत.
फ्रेट शुल्कामध्येही सुमारे २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. चिनी उत्पादकांकडून भारतात पाठविल्या जाणाऱ्या वैद्यकीय पुरवठ्यांच्या किंमती वाढविण्याच्या प्रश्नावर चीनी प्रतिनिधी वांग म्हणाले, चीन चीनकडून वैद्यकीय पुरवठा करण्यास भारत तयार आहे, ही एक व्यावसायिक क्रिया आहे. मात्र सिचुआन एअरलाइन्सच्या मालवाहू उड्डाणांची भारताकडे स्थगिती करण्याच्या निर्णयावर वांग यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.