नवी दिल्ली – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तब्येतीबाबत अनेक अफवा उडत आहेत. विविध माध्यमांकडून त्यांच्या तब्येतीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. परदेश दौर्यांबाबत जिनपिंग यांची उदासीनता याला कारणीभूत असल्याचे कारणही सांगितले जात आहे. ते बैठकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत किंवा समोरासमोर भेट घेण्याच्या स्थितीत नसल्याचे कयास लावले जात आहेत. जिनपिंग यांची तब्येत बिघडल्याचे कारणे पुढीलप्रमाणे –
सहाशे दिवसांत एकही परदेशी दौरा नाही
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चिनी राष्ट्राध्यक्ष गेल्या सहाशे दिवसांत एकदाही परदेश दौर्यावर गेलेले नाहीत. ते यापूर्वी १८ जानेवारी २०२० मध्ये म्यानमार दौर्यावर गेले होते. त्यानंतर ते देशाच्या बाहेरच गेले नाहीत.
वैयक्तिक भेटीगाठी बंद
सध्याच्या परिस्थितीत जिनपिंग हे कोणत्याही परदेशी नेत्याला वैयक्तिकरित्या भेटलेले नाहीत. कोणत्याही परदेशी नेत्यांचा जिनपिंग यांना वैयक्तिक भेटीचा कार्यक्रम नाही. एखाद्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी चीनचा दौरा केला तरी ते बीजिंगमध्ये न जाता इतर शहरांमध्ये जातात.
टेलिफोन चर्चेवर भर
आरोग्याच्या कारणांमुळे जिनपिंग आता सर्वाधिक टेलिफोनवरील चर्चेला प्राधान्य देत आहेत. वरील कालावधीत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅनुअल मॅक्रो यांच्यासह ६० राष्ट्राध्यक्षांशी टेलिफोनवर चर्चा केली आहे.
व्हर्चुअल बैठकांमध्ये सहभाग
या वर्षी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु आता व्हर्चुअल माध्यमातून ते उपस्थिती लावतात. ब्रिक्सच्या ९ सप्टेंबर २०२१ मध्ये आयोजित बैठकीत जातीने हजर राहण्याऐवजी व्हर्चुअल माध्यमातून सहभागी होण्यास पसंती दर्शविली. ऑक्टोबरमध्ये रोममध्ये होणार्या जी-२० संमेलनातसुद्धा जिनपिंग वैयक्तिक हजर राहण्याबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
विनाकारण बैठका स्थगित
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनमध्ये आलेल्या अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री, सिंगापूरचे पंतप्रधान, डेनिश पंतप्रधान यांच्यासोबतच्या बैठका कोणतेच कारण न देता स्थगित केल्या आहेत.
पाय अडखळले
माध्यमांच्या वृत्तामध्ये मार्च २०१९ मध्ये जिनपिंग इटली, मोनाको आणि फान्स दौर्यावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यादरम्यान गार्ड ऑफ ऑनरअंतर्गत निरीक्षण करताना त्यांचे पाय अडखळत असल्याचे निदर्शनास आले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांच्यासोबत चर्चेदरम्यान खुर्चीवरून उठताना त्यांना हातांचा आधार घ्यावा लागला होता.
भाषणादरम्यान खोकला
शेनझेन या विशेष आर्थिक क्षेत्राच्या स्थापनेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त जिनपिंग हे नियोजित वेळेपेक्षा उशिरा भाषण देण्यासाठी मंचावर पोहोचले. एका तासाच्या भाषणादरम्यान ते खूपच मंद गतीने बोलले. त्यादरम्यान त्यांना सतत खोकला येत होता. त्यामुळे सारखे पाणी प्यावे लागले.