बीजिंग – तसं पाहिलं तर चीन हा लाेकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. पण, आता त्याचे हे बिरूद किती काळ टिकेल, टिकेल की नाही, हा एक प्रश्नच आहे. कारण, येथे एका मुलाला सांभाळण्याचा खर्च कोट्यवधींच्या घरात जात असल्याने येथील तरुण आता नवीन मुलांना जन्म देण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. वास्तविक, येथील सरकारने तरुणांना तीन मुलांना जन्म देण्याची सूट दिली आहे. पण या आर्थिक कारणांमुळे सरकारची इच्छा काही पूर्ण होईल, असे वाटत नाही.
येथे नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार, नवीन मुलांचा जन्म तसेच तरुणाईचे कमी प्रमाण, आणि वृद्धांचे वाढते प्रमाण पाहता, चीनने ही तीन मुलांना जन्म देण्याचे धोरण राबवले आहे. पण, तरुणाई काही त्यासाठी तयार नाही. यासाठी आर्थिक कारणे सुरुवातीपासूनच होती. आणि आता कोरोनाच्या काळात तर ती अधिक ठामपणे समोर येत आहेत.
सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक सेवा सुविधा मिळतात. पण, प्रत्यक्षात त्यांची संख्या कमी आहे. यामुळे इच्छा असो वा नसो गर्भवतींना खाजगी रुग्णालयांमध्ये जावेच लागते. इथला बाळंतपणाचा संपूर्ण म्हणजे, ९ महिन्यांचा खर्च हा जवळपास १ लाख युआन म्हणजे आपल्याकडील साडे अकरा लाख एवढा असतो. तर डिलिव्हरीनंतरही तुम्हाला घरी बाळाला सांभाळायला ठेवायचं असेल त्यासाठी १५ हजार युआन म्हणजेच तब्बल पावणे दोन लाख रुपये मोजावे लागतात.










