बीजिंग – अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर काही देशांनी आपापली भूमिका स्पष्ट केली तर काहींची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. अपेक्षेनुसार, चीन आणि पाकिस्तान तालिबान शासनाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अफगाणिस्तानमधील तालिबानवर दबाव टाकण्याऐवजी त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असे चीनने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांनी ब्रिटिश परराष्ट्र सचिव डॉमिनिक रॅब यांच्याशी फोनवर चर्चा केली. वांग यी म्हणाले, की अफगाणिस्तान सध्या सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. तालिबान्यांवर दबाव टाकण्याऐवजी जगाने त्यांना मार्गदर्शन करून पाठिंबा द्यायला हवा.
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अफगाणिस्तानात सध्या अस्थिर आणि अनिश्चित परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानावर अधिक दबाव टाकण्याऐवजी त्यांना सकारात्मक दिशेत प्रोत्साहित आणि मार्गदर्शित करणे अपेक्षित आहे. असे केल्यास तेथील परिस्थितीला स्थिर करण्यासाठी अनुकूल ठरेल.
चीनने अद्याप अधिकृतरित्या तालिबानला अफगाणिस्तानातील नव्या सरकारच्या रूपाने मान्यता दिलेली नाही. परंतु वांग यांनी गेल्या महिन्यात तियानजीनमध्ये तालिबानचे राजनयिक विभागाचे प्रमुख मुल्ला बरादर यांचे आदरातिथ्य केले होते. तालिबान अफगाणिस्तानमधील शांतता आणि पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावेल, अशी अपेक्षा वांग यांनी व्यक्त केली होती.
रॅब यांच्याशी फोनवर चर्चा करताना वांग म्हणाले की, अफगाणिस्तानातील गृहयुद्धाच्या मैदानाचा आंतरराष्ट्रीय समुदायाने वापर करू नये. त्यांचे स्वातंत्र्य आणि तेथील लोकांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे. चीन तालिबानशी संपर्कात आहे. अफगाणिस्तानावर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर त्यांच्या कामावर निष्पक्ष निर्णय घ्यायला हवा. तालिबान सर्वाधिक स्पष्ट आणि विवेकशील झाला आहे. महिलांच्या अधिकारांसह त्यांनी दिलेले आश्वासने पूर्ण करतील अशी आशा आहे.