नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या संसर्गाने चीनमध्ये पुन्हा उसळी मारली आहे. चीनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असले तरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग फोफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच चीनमधील तब्बल ४० लाख लोकसंख्या असलेल्या लन्झाऊ या शहरात चीनने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. जगभरात कोरोनाच्या दुसऱअया लाटेने हाहाकार माजविला. लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असे सागितले जात होते. मात्र, चीन आणि रशियात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नवे रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने देशात पुन्हा नव्याने प्रतिबंध वाढविले आहेत. पर्यटकांमधील एका ज्येष्ठ दांपत्यामुळे संसर्ग वाढल्याचे सांगितले जात आहे. हे दाम्पत्य शांघाई येथून गांसू प्रांतातील सियान आणि मंगोलिया येथे गेले होते. या दाम्पत्याच्या संपर्कात आलेले नागरिकच कोरोनाबाधित आढळत आहेत. स्थानिक पातळीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच येथील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. संसर्ग झालेल्या परिसरातील शाळा आणि मनोरंजनाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत.
मॉस्कोत आठवडाभर लॉकडाउन
रशियामध्येही कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. सर्व कामगारांना पगारी रजा देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनाही घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व दुकाने, बार, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद असतील, असे मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेतील सुपरमार्केट आणि मेडिकल सुरू राहणार आहेत.
https://twitter.com/ANI/status/1452894916137263110?t=9XJ4Mfe54AUiogtt_UcsDw&s=03