पुणे – मुलांना समजायला लागले की त्यांच्या हातात ब्रश देऊन नळापुढे उभे करण्याची समस्त मानव जातीत पुरातन परंपरा आहे. जगात कुठेच ब्रश केला जात नाही, असा प्रदेश नसेल. अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. विशेषतः दुर्गम भागात राहणारे लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासतात, तर शहरी भागांमध्ये राहणारे लोक टुथपेस्ट आणि ब्रश वापर करतात. पण एकेकाळी जगातील पॉवरफूल नेत्यांमध्ये गणना होत असलेल्या व्यक्तीने त्याच्या अख्ख्या आयुष्यात कधीच दात घासले नाही.
आश्चर्य वाटेल, पण चीनचा साम्यवादी क्रांतीकारक, राजकारणी व चीनच्या राज्यक्रांतीचा प्रणेता माओत्से तुंग याने त्याच्या अख्ख्या आयुष्यात कधीच दात घासले नाही. माओत्से तुंगचे डॉक्टर राहून चुकलेले जी शी ली यांनी त्यांच्या जीवनावर ‘दि प्रायव्हेट लाईफ आफ चेअरमन माओ’ असे पुस्तक लिहीले आहे. त्यात अनेक खुलासे त्यांनी केले आहेत. माओ सकाळी झोपून उठले की ते ब्रश करण्याऐवजी दात घासण्यासाठी चहाच्या गुळण्या करायचे, असे डॉक्टरने लिहीले आहे. त्यांचे दात हिरव्या रंगाने रंगलेले आहेत, असेच वाटायचे, असेही ते म्हणतात. केवळ दातच घासण्याचे सोडा, माओत्से तुंग अंघोळदेखील कधीकधीच करायचे. त्यांचा दिवस रात्री सुरू व्हायचा. जग झोपले असायचे तेव्हा ते काम करायचे आणि लोक झोपून उठायचे तेव्हा ते झोपायला जायचे.
पलंग सोबत न्यायचे
माओच्या बाबतीत आणखी एक बाब खूप प्रसिद्ध आहे. माओ कधीच दुसऱ्यांच्या पलंगावर झोपायचे नाहीत. त्यांचा एक ठरलेला पलंग होता, त्यावरच ते झोपायचे. विदेश दौऱ्यावर जाताना त्यांचा पलंगही त्यांच्यासोबत असायचा.
उत्तम प्रशासक
२६ डिसेंबर १८९३ ला हुनान येथील शाओशानमध्ये त्यांचा जन्म झाला. जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांची गणना होते. चीनचे नागरिक त्यांना एक उत्तम व महान प्रशासक मानते.
एकच पण मोठी चूक
माओच्या एका भयंकर चुकीमुळे कोट्यवधी लोक मारले गेले होते. १९५८ मध्ये माओने फोर पेस्ट कँपेन राबविले होते. यात त्यांनी डास, माशी, उंदीर आणि एक पक्षी यांना मारण्याचे आदेश दिले होते. त्यांचा हा प्रयत्न उलटला आणि नंतर चीनमध्ये भयंकर असा दुष्काळ पडला आणि लोक उपासमारीने मरू लागले. त्यावेळी दीड कोटी लोकांचा मृत्यू झाला होता, असे म्हणतात.