नवी दिल्ली – सीमारेषेजवळील चीन आणि भारत यांच्यातील वाद अद्याप मिटलेला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ७५ वर्षात भारत चीन संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. याचा परिणाम सीमेवर नेहमीच दिसून येतो. कधी प्रत्यक्ष तर कधी सैनिकांमधील चकमक असे या तणावाचे स्वरूप असते. सन १९६२ मध्ये तर भारत आणि चीन मध्ये युद्ध देखील झाले होते. चीनचे अलीकडच्या काळातील साम्राज्यवादी धोरण आणि महासत्ता बनण्याचे स्वप्न आता जगभरातील सर्वच देशांना कळून चुकले आहे.
अगदी अमेरिकेला मागे टाकून कधी त्यांच्याशी मैत्रीचे धोरण तर कधी छुप्या कारवाया करत चीन महासत्ता बनू पाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिनी सरकार वेळोवेळी कारस्थान करत असते. त्यातच आता चीनने सिमेवर काही नवीन गावे वसविली आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवर आणखीनच तणाव वाढण्याची शक्यता आहे.
काही उपग्रहांवरून आलेल्या काही नवीन छायाचित्रांमध्ये ड्रॅगनने आता भूतानमध्ये घुसखोरी सुरू केल्याचे दिसून आले आहे. डोकलामजवळ चीनने ही गावे वसवली आहेत. गेल्या एक वर्षात चीनने भूतानच्या सीमेवर सुमारे १०० चौरस किलोमीटर परिसरात अनेक नवीन गावे बांधली आहेत. डोकलामला लागून असलेल्या भूतानच्या सीमेजवळ सिक्कीममध्ये चीन अनेक इमारती बांधत असल्याचा दावा केला जात आहे.
सॅटेलाइट इमेजरी तज्ज्ञाने ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. चीनने भूतानच्या सीमेवर अनेक गावे बनवली असल्याचा दावा इंटेल लॅबच्या एका संशोधकाकडून केला जात आहे. डोकलामजवळील भूतान आणि चीनमधील वादग्रस्त जमिनीवर गेल्या वर्षापासून बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे अनेक गावांचा विकास झाला आहे.
तसेच मे २०२० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान चार गावे तयार करण्यात आल्याचे काही अहवालामध्ये म्हटले जात आहे. या भागात काम सुरू आहे.
याचवेळी डोकलामसोबतच पश्चिम भूतानचे तीन भाग आणि उत्तरेकडील तीन भागही चीनच्या सीमेखाली येतात, असा चीनचा दावा आहे. डोकलाम भूतानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही. याउलट हा भाग भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तेथून सिलीगुडी कॉरिडॉरपर्यंत चीनची नजर आहे. सिलीगुडी कॉरिडॉर सामान्यतः ‘चिकन नेक’ म्हणून ओळखला जातो. याच भागात चीनने भूतानमध्ये चार नवीन गावे निर्माण केल्याचा धक्कादायक दावा जातो.
https://twitter.com/detresfa_/status/1460970809871134727?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1460970809871134727%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-375173284589349204.ampproject.net%2F2111060251003%2Fframe.html