वॉशिंग्टन – चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा अमेरिका, ब्रिटेन आणि इतर देशांचे संशोधक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीन आता यावर सारवासारव करत आहे. चीनी प्रशासन या संदर्भातील नमुन्यांना नष्ट करून कागदपत्रे लपविण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार मंडळाचे सदस्य जेमी मेटजल यांनी फॉक्स न्यूजला दिली. चीन सरकार आपल्या संशोधकांना खोटे आदेश देत असून, मूलभूत प्रश्न विचारणार्या लोकांना आणि पत्रकारांना कारागृहात टाकत आहे.
जेमी मेटजल सांगतात, चीन कथितरित्या येत्या पाच वर्षांमध्ये डझनावर जैव सुरक्षेचा स्तर, तीन प्रयोगशाळा आणि एक जैवसुरक्षा स्तर चार प्रयोगशाळा बनविण्याची योजना आखत आहे. चीनच्या प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर पडू शकतो असा विश्वास संशोधकांना वाटत आहे. त्यावर ते लक्ष ठेवून आहेत.
संशयाची सुई
मेटजल सांगतात, या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे भासवून स्वतःची सुटका करून घेण्याचे प्रयत्न चीन करत असला तरी तो आणखी संशयाच्या घेर्यात येत आहे. जगभरात पसरलेल्या महामारीच्या चौकशीचा अधिकार आम्ही चीनला देऊ शकत नाही. महामारीच्या संदर्भात पूर्ण चौकशीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रयोगशाळेतून विषाणूचा प्रादुर्भाव
चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे अमेरिका सरकारच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेने २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. गोपनीय कागदपत्रांपर्यंत पोहोचणार्या लोकांच्या हवाल्यातून वॉल स्ट्रीट जर्नलने ही माहिती दिली आहे. कॅलिफोर्नियामधील या प्रयोगशाळेने मे २०२० मध्ये आपला अहवाल दिला होता. वुहान येथील प्रयोगशाळेतून विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून चौकशीची गरज असल्याचे या अहवालात म्हटले होते. सार्स-सीओवी-२ विषाणूच्या जिनोम विश्लेषणाद्वारे अमेरिकेच्या प्रयोगशाळेने हा निष्कर्ष काढला होता.