विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीने साऱ्या जगाला अस्वस्थ करून सोडले आहे. अनेक देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे, तर काही देशांमध्ये तिसरी लाट आलेली आहे. अश्यात परस्पर वैमनस्य विसरून सारे देश एकमेकांच्या मदतीला उभे आहेत. मात्र चीनची नजर भारत असो वा अमेरिका साऱ्याच देशांच्या बाबतीत कायम वाकडीच राहीलेली आहे. पाकिस्तानची अवस्था कुत्र्यासारखी केल्यानंतर चीनने श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या भारताच्या शेजाऱ्यांवर आपला प्रभाव वाढविण्याचे काम सुरू केले आहे.
बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये चीन मोठी गुंतवणुक करण्याच्या तयारीत आहे. केवळ एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर या तिन्ही देशांना राजकीय समर्थ देऊन तेथे जम बसविण्याची पूर्ण तयारी सुरू झाली आहे. या देशांमधील बंदरांवर चीनला नियंत्रण हवे आहे. म्हणजे हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यातील मार्गांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे चीनला वाटत आहे. चीनने पाकिस्तान, म्यानमार आणि श्रीलंका येथे बंदरेदेखील उभी केली आहेत. भारताची घेराबंदी करण्यासाठी चीन पाकिस्तानला मोहरा बनवत आहे. बांगलादेशला आर्थिक मदत, पायाभूत सुविधा आदींच्या बाबतीत मदत करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळ-भुतानकडे मोर्चा
नेपाळ आणि भुतान आतापर्यंत तरी भारताच्या प्रभावात आहेत. मात्र चीन या देशांनादेखील आपल्या अख्त्यारित आणण्याचा प्रयत्न करीत आहे. नेपाळमध्ये माओवाद्यांची सत्ता आल्यानंतर चीनसाठी वातावरण अनुकुल झाले आहे. मात्र नेपाळमधील भारताचा प्रभाव त्याला कमी करता येणार नाही, हेही तेवढेच खरे. तरीही एक असा मैत्री करार चीनला करायचा आहे, ज्यातून 1950 चा भारत-नेपाळ करार निष्प्रभ करेल.
भारताची भूमिका
भारताचे माजी परराष्ट्र सचिव शशांक यांचे म्हणणे आहे की भारताने क्वाडच्या माध्यमातून चीनच्या राजकीय मोर्चेबंदीला उत्तर दिले आहे. क्वाड प्लसच्या रणनितीवरही काम सुरू आहे. त्यादृष्टीने श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मालदीव या देशांमध्ये भारताने आपली सक्रीयता कायम ठेवली आहे.