नवी दिल्ली – आपल्या देशात चिनी वस्तू स्वस्त मिळत असल्या तरी, त्याची गुणवत्ता जगजाहीर आहे. चायनीज मालावर आपल्याकडे अनेक विनोदही प्रचलित आहेत. चीनची लस सुद्धा त्याच गुणवत्तेची आहे. हे आमचे म्हणणे नसून, त्यांचेच अधिकारी सांगत आहेत. चीनच्या कोविड लशीच्या गुणवत्तेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झालेले आहेत. चीनच्या लशीची पोलखोल त्यांच्याच अधिकाऱ्याने केली आहे. चीनमध्ये तयार केलेली लस कमी प्रभावशाली आहे, असे त्यांच्याच रोग नियंत्रण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोरोना लशीला आणखी प्रभावशाली करण्यासाठी चीनेचे शी जिनपिंग सरकार विचार करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक गाओ फू शनिवारी एका कार्यक्रमात म्हणाले, चीनच्या लशीचे दर अधिक नाहीत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणात वेगवेगळ्या लशींचा वापर करवा की नाही याबाबत गंभीरतेने विचार सुरू आहे.
चीनने इतर देशांना कोविड लशींचे कोट्यवधी डोस पुरवल्यानंतर गाओ फू यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. पाश्चिमात्य देशांच्या लशींच्या प्रभावाबाबत चीनकडून नेहमीच संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चीनच्या सिनोवॅकच्या लशींच्या प्रभावाचा दर ५०.४ टक्के असल्याचे ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी खूप आधीच सांगितले होते. तेव्हासुद्धा चीनच्या लशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
चीनच्या लशीच्या तुलनेत फायझर कंपनीने बनविलेली लस ९७ टक्के प्रभावशाली आहे. लस तयार करताना पाश्चिमात्य देशातील लस निर्मात्या कंपन्या वापरत असलेल्या एमआरएनए या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही गाओ फू आपल्या संबोधनात म्हटले आहे. परंतु चीनमधील लस निर्मात्या कंपन्या पारंपरिक तंत्रज्ञान वापरण्यावरच विश्वास ठेवतात. एमआरएनए या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा विचार चीनला करावा लागेल असे गाओ फू म्हणाले.