नवी दिल्ली – कोरोना विषाणूची उत्पत्ती झाल्याचा आरोप झेलणार्या चीनमध्ये संसर्गाने पुन्हा उचल खालली आहे. चीनच्या अनेक भागात रुग्ण आढळत असल्याने सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेत ७५ टक्क्यांहून अधिकचा टप्पा चीनने पूर्ण केला आहे. मात्र तरीही कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने सरकारी यंत्रणा हादरली आहे.
चीनमध्ये कोरोनाविरोधातील मोहिमेत आतापर्यंत १.०७ अब्ज नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. तरीसुद्धा चीनमधील १४ प्रांतात आढळणार्या नव्या कोरोनारुग्णांमुळे दहशत निर्माण झाली आहे. राजधानी बीजिंग आणि उत्तर चीनच्या पर्यटनस्थळांवर आढळणार्या नव्या कोरोना रुग्णांनी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे (एनएचसी) अधिकारी म्हणाले, चीनने कोविडविरोधात लढा देताना देशातील १.४१ अब्ज लोकसंख्येपैकी १.०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अजूनही १४ प्रांतात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्या कमी झालेल्या नाहीत. चीनने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) ५९ नवे रुग्ण आढळल्याची पुष्टी केली आहे. १६ सप्टेंबरनंतर चीनमध्ये कोरोना संसर्गाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. एनएचसीच्या अहवालानुसार, चीनमध्ये कोरोनाचे बहुतांश रुग्ण उत्तर भागात आढळले आहेत. बीजिंग, हेइलोंग जियांग, इनर मंगोलिया, गांसू आणि निंग्जियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या भीतीदायक आहे.
एनएससीचे प्रवक्ते एमआय फेंग यांनी पत्रकारांना सांगितले, कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने महामारीला रोखण्याची तसेच नियंत्रणाची परिस्थिती गंभीर आणि जटिल झाली आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यास एका महिन्यात यश मिळेल, असे चीनमधील वरिष्ठ वैज्ञानिग झोंग नानशान यांनी सिन्हुआ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
मुलांचे लसीकरण सुरू
एनएचसीचे प्रवक्ते एमआय म्हणाले, कोविडविरोधातील मोहिमेत चीनने २९ ऑक्टोबरपर्यंत १.०७ अब्ज नागरिकांना कोरोनाविरोधी लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. म्हणजेच देशातील ७५.८ टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे. कोरोनाची तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चीनच्या अनेक प्रांतात ३ ते ११ वर्षांच्या मुलांचे लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. चायना डेलीच्या वृत्तानुसार, चांगडे, हुनान प्रांत आणि जिन्हुआ झेजियांग प्रांतासह अनेक शहरांमध्ये मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.