इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात गेल्या दोन वर्षात कोरोनाचा हाहाकार उडाला होता. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये अनेक देशांमध्ये कोट्यावधी नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर बहुतांश देशांमधून कोरोनाची लाट ओसरू लागली आहे. चीनमध्ये मात्र पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक दिसू लागला आहे.
सध्या चीनमध्ये कोरोनाचे २० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. साथीच्या रोगाची सुरुवात झाल्यापासून एका दिवसात नोंदवलेल्या दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. शांघायमध्ये लॉकडाऊन असूनही प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे खूप चिंता वाढली आहे.
मार्चपर्यंत, चीनने लॉकडाऊन, ग्रुप टेस्टिंग आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर कडक निर्बंधांसह दैनंदिन केसेस नियंत्रित केल्या होत्या. पण अलिकडच्या आठवड्यात त्यात मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये बुधवारी संसर्गाची २०,४७२ प्रकरणे नोंदवली गेली. मात्र, एकाही रुग्णाला जीव गमवावा लागला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
शांघायमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची मोठी गर्दी आहे. कोविड पॉझिटिव्ह अर्भक आणि लहान मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे केले जात आहे. या धोरणामुळे पीडितांच्या कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये कोरोनासाठी राष्ट्रीय आकडेवारीपैकी ८० टक्क्यांहून अधिक प्रादुर्भाव आहे. याला सामोरे जाण्यासाठी पुरेशी तयारी नसल्याचे शांघायच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मान्य केले आहे.
सीसीटीव्हीच्या अहवालानुसार, शांघायमध्ये संपूर्ण लोकसंख्येची नव्याने चाचणी केली जाईल. अन्नधान्याचा तुटवडा आणि लॉकडाऊनमुळे रहिवाशांमध्ये संताप वाढत आहे. २०१९ च्या शेवटी, कोरोना विषाणू पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. येथून ही महामारी संपूर्ण जगात पसरली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याला चिनी विषाणू असेही संबोधले होते.